भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. गांगुली यांच्यावर आणखी एक अ‍ॅजिओप्लास्टी करण्यात येणार होती. पण ही अ‍ॅजिओप्लास्टी लांबणीवर टाकणे हा सध्याच्या घडीला सुरक्षित पर्याय आहे, असे वुडलँड हॉस्पिटलच्या सीईओ रुपाली बासू यांनी सोमवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

४८ वर्षीय गांगुलीवर उपचार करण्यासाठी नऊ सदस्यीय वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती रुपाली बासू यांनी दिली. कार्डिअ‍ॅक सर्जन्स देवी शेट्टी, रमाकांत पांडा, कार्डिओलॉजिस्ट सॅम्युल मॅथ्युज, सामीन शर्मा, कार्डिओलॉजिस्ट अश्विन मेहता यांची मते झूम अ‍ॅप तसेच फोनच्या माध्यमातून जाणून घेण्यात आली. बसू यांनी ही माहिती दिली.

आणखी वाचा- “सौरव गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी दबाव,” ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर मोठं वक्तव्य

“तज्ज्ञांच्या बैठकीत गांगुलीच्या ह्दयातील आणखी दोन ब्लॉकेजेस बद्दलही चर्चा करण्यात आली. अ‍ॅजिओप्लास्टी लांबणीवर टाकणे हा सध्याच्या घडीला सुरक्षित पर्याय आहे यावर तज्ज्ञांचे एकमत झाले” असे बसू म्हणाल्या.  आता गांगुलीच्या छातीत दु:खत नाहीय, त्याची प्रकृती सुद्धा स्थिर आहे. “गांगुलीच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांना आजार आणि उपचाराबद्दल व्यवस्थित समजावून सांगण्यात आले” अशी माहिती बसू यांनी दिली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे गांगुलीच्या प्रकृतीवर लक्ष असेल असे बसू म्हणाल्या.