गेले काही दिवस विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातल्या वादामुळे बीसीसीआयचं वातावरण ढवळून निघालं होतं. अनेक तर्क-वितर्कांमध्ये विराट कोहलीने आपल्या पसंतीचे रवी शास्त्री प्रशिक्षकपदी यावेत म्हणून हे सर्व प्रकरण घडवून आणल्याचं काही वृत्तपत्रांमध्ये छापून आलं होतं. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षपदासाठी अर्ज केल्यास तेच या पदासाठी पसंतीचे उमेदवार ठरु शकतात असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता, तसे संकेतही बीसीसीआयकडून मिळाले होते.

आणि ठरवल्याप्रमाणे अखेर रवी शास्त्री यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करण्याचं ठरवलं आहे. स्वतः रवी शास्त्री यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात झालेल्या वादानंतर कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळे यांना मुदतवाढ मिळूनही कुंबळेंनी राजीनामा दिल्यामुळे बीसीसीआयला प्रशिक्षकपदाच्या अर्जांसाठी मुदतवाढ द्यावी लागली. काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनूसार संघातील काही खेळाडू आणि कर्णधार विराट कोहली अनिल कुंबळेंऐवजी रवी शास्त्री यांच्या नावासाठी आग्रही होते.

कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर, प्रशिक्षक म्हणून निवड होणार असेल अशी खात्री बीसीसीआय देणार असेल तरच आपण अर्ज करु असा पवित्रा शास्त्रींनी घेतल्याचं पुढे आलं होतं. मात्र रवी शास्त्री यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी विरेंद्र सेहवाग, दोड्डा गणेश, लालचंद राजपुत, टॉम मुडी आणि रिचर्ड पायबस अशी ५ नावं चर्चेत आहेत. त्यातच कोहली ज्या नावासाठी आग्रही होता ते रवी शास्त्रीही या पदासाठी अर्ज करणार असल्याने शास्त्रींची या पदावर निवड होईल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.