टीम इंडियातील खेळाडूंसाठी प्रत्येकी अडीच लाख रूपये किंमतीचा इटालियन सूट शिवून घेण्याचा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) फेटाळण्यात आल्याचे कळते. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल जोहरी यांनी हा प्रस्ताव मांडला होता. मात्र, लोढा समितीच्या अहवालानंतर न्यायालयाकडून बीसीसीआयच्या आर्थिक कारभारावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. या इटालियन सूटसाठी इतका खर्च झाल्यास ही उधळपट्टी वादाचा विषय बनू शकते. त्यामुळेच बीसीसीआयमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या इटालियन सूटचा प्रस्ताव नाकारल्याचे समजते.
राहुल जोहरी यांनी भारतीय संघातील खेळाडू आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसाठी एकुण ५० सूट तयार करून घेण्याचा हा प्रस्ताव ईमेलद्वारे अनुराग ठाकूर, अजय शिर्के आणि अन्य सदस्यांना पाठवला होता. भारतीय संघाला निश्चितपणे नव्या फॉर्मल कपड्यांची गरज आहे. या प्रत्येक सूटची किंमत अडीच लाख इतकी आहे. अशाप्रकारेच ५० सूट तयार करून घेण्याचा आमचा विचार आहे, असे राहुल जोहरी यांनी ईमेलमध्ये म्हटले होते.

सध्या न्यायालयाने बीसीसीआयच्या निर्णय घेण्याच्या अधिकारांवर निर्बंध घातले आहेत. बीसीसीआय आणि राज्यनिहाय संघटनांनी लोधा समितीच्या शिफारशी स्विकारल्याशिवाय बीसीसीआयला कोणताही निर्णय घेता येणार नसल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशांनुसार बीसीसीआय कोणताही नवा करार करू शकत नसल्याची बाब बीसीसीआयचे कायदेशीर सल्लागार अभिनव मुखर्जी यांनी निदर्शनास आणून दिली. कोणत्याही कंत्राटदाराची नियुक्ती टेंडर प्रक्रियेद्वारे केली जावी, असे लोधा समितीच्या अहवालात म्हटले आहे. मात्र, टीम इंडियासाठी सूट तयार करून घेण्याचा प्रस्ताव खासगी स्वरूपाचा आहे. त्यामुळे आपल्याला हा प्रस्ताव समितीपुढे उपस्थित करावा लागेल, असे मुखर्जी यांनी म्हटले. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर ईमेल संभाषणात हस्तक्षेप करत आपण लोधा समितीकडे जाणार नसल्याचे म्हटले. तसेच इटालियन सूटच्या या प्रस्तावावर अधिक विचार करण्याची गरज नसल्याचेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.