Ben Duckett Sensational Catch to Dismiss Shardul Thakur: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. या कसोटी सामन्याच्या पाचही दिवशी पावसाची चिन्ह आहेत. दरम्यान दुसऱ्या दिवशी पावसाच्या उपस्थितीमुळे लंचब्रेक १० मिनिटं लवकर घेण्यात आला. लंचब्रेकच्या काही मिनिटआधी शार्दुल ठाकूर बाद झाला. शार्दुल ठाकूरने वॉशिंग्टन सुंदरसह चांगली भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. पण स्टोक्सच्या गोलंदाजीवर बेन डकेटने अनपेक्षित झेल टिपत त्याला माघारी धाडलं.

चौथ्या कसोटीत साई सुदर्शन बाद झाल्यानंतर अष्टपैलू शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला होता. त्याने पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात ऋषभ पंतला चांगली साथ देत भारताचा डाव सावरला. पण ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाल्याने तो रिटायर्ड होत माघारी परतला. यानंतर जडेजा आणि शार्दुलने संघाची जबाबदारी घेतली. यासह पहिल्या दिवशी २६४ धावा केल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच जडेजा झेलबाद झाला. पण शार्दुलने मात्र ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

इंग्लंडने दुसऱ्या दिवशी नवीन चेंडूने गोलंदाजीला सुरूवात केली. पण शार्दुल ठाकूरने कमालीची फलंदाजी करत धावा केल्या. स्टोक्सच्या षटकात शार्दुल ठाकूर स्ट्राईकवर होता आणि ३ चेंडू डॉट खेळल्यानंतर आऊटस्विंगरवर मोठा खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेत गलीमध्ये गेला. गलीमध्ये बेन डकेट क्षेत्ररक्षण करत होता आणि त्याने कोणतीही चूक न करता डाईव्ह मारत कमालीचा झेल टिपला.

शार्दुल ठाकूरने चांगली फलंदाजी करत तो अर्धशतकाच्या दिशेने पुढे जात होता. पण शार्दुलचं अर्धशतक ९ धावांनी हुकलं. शार्दुल ठाकूरने ८८ चेंडूत ५ चौकारांसह ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय त्याने वॉशिंग्टन सुंदरसह अर्धशतकी भागीदारी रचली आणि संघाला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शार्दुल बाद झाल्यानंतर दुखापत झालेला ऋषभ पंत मैदानावर उतरला. ऋषभ पंतच्या उजव्या पायाच्या बोटाला चेंडू लागल्याने त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली. पण तरीही पंत चौथ्या कसोटीत फलंदाजीला उतरला आहे. पंत या सामन्यात यष्टीरक्षण करणार नसून तो फक्त फलंदाजीला उतरेल. नीट चालताही येत नसताना पंत संघासाठी मैदानात उतरल्याने संपूर्ण स्टेडियमने उभं राहत त्याचं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या. यासह भारताने दुसऱ्या दिवसाच्या लंचब्रेकपर्यंत ६ बाद ३२१ धावा केल्या आहेत.