प्रो कबड्डी लीग
बंगाल वॉरियर्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यात सोमवारी अहमदाबादमध्ये झालेली लढत २९-२९ अशी बरोबरीत सुटली. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात उभय संघांमध्ये बरोबरीत सुटलेला हा पाचवा विक्रमी सामना ठरला.
सिद्धार्थ आणि सूरज देसाई यांनी तेलुगूला शानदार सुरुवात करून दिली. बचावपटूंनीही चांगली साथ दिल्यामुळे तेलुगूने सुरुवातीलाच आघाडी घेतली होती. मध्यंतराला १३-११ अशी स्थिती असताना तेलुगूने बंगालवर लोण चढवत दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच पाच गुणांची आघाडी घेतली होती. मात्र बंगालनेही तेलुगूवर लोणची परतफेड करत सामन्यात पहिल्यांदाच एका गुणाने आघाडी घेतली. अखेरच्या मिनिटाला तेलुगूच्या अरमानची बलदेव सिंहने पकड करत सामना २९-२९ अशा स्थितीत आणला. मात्र अखेरच्या चढाईत दोन्ही संघांच्या खेळाडूंना एकही गुण मिळवता न आल्याने सामना बरोबरीत सुटला.
दरम्यान, श्रीकांत जाधवने चढायांमध्ये तर सुमितने पकडींमध्ये चमक दाखवल्यामुळे यूपी योद्धा संघाने बेंगळूरु बुल्सचे आव्हान ३५-३३ असे परतवून लावले. रोहित कुमारने प्रो कबड्डी लीगमध्ये चढायांचे ५०० गुण मिळवले. बेंगळूरुच्या पवन शेरावतने चढायांमध्ये तसेच पकडींमध्ये मिळून १५ गुणांची कमाई केली, मात्र त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही. मोनू गोयतने आठ गुणांची कमाई करत यूपी योद्धाच्या विजयात योगदान दिले.