गिरिप्रेमीने आयोजित केलेल्या लोत्से (उंची ८,५१६ मीटर) व माउंट एव्हरेस्ट (उंची ८,८४८ मीटर) मोहिमेस शुभेच्छा व ध्वजप्रदान करण्याचा कार्यक्रम रविवार दिनांक ३ मार्च रोजी होणार आहे. पीवायसी हिंदू जिमखाना येथे सायंकाळी ५.३० वाजता प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी व ज्येष्ठ गिर्यारोहक ब्रिगेडिअर अशोक अ‍ॅबे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. ब्रिगेडिअर अशोक अ‍ॅबे यांच्या नेतृत्वाखाली सेनादलाने लोत्से-एव्हरेस्ट अशी संयुक्त मोहीम यशस्वी केली होती.
गिरिप्रेमी संस्थेने उमेश झिरपेच्या नेतृत्वाखाली गतवर्षी एव्हरेस्ट मोहीम यशस्वी केली होती. या मोहिमेत एव्हरेस्ट शिखर काही तांत्रिक अडचणींमुळे सर करू न शकणारे सदस्य यंदा पुन्हा एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करण्याचा प्रयत्न करणार आहेत. लोत्से हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शिखर मानले जाते. तांत्रिकदृष्टय़ा आव्हानात्मक शिखर म्हणून या शिखराची ख्याती आहे. गिरिप्रेमी संस्थेच्या संयुक्त मोहिमेचे नेतृत्व उमेश झिरपे करीत असून या मोहिमेत टेकराज अधिकारी, आशिष माने, आनंद माळी, भूषण हर्षे, गणेश मोरे व अजित ताटे हे सहभागी होत आहेत.