‘‘२०१०मध्ये महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आणि वयाच्या २०व्या वर्षी महिला ग्रँडमास्टर असे किताब पटकावल्यानंतर मला आता पुरुषांचा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब खुणावत आहे. बल्गेरियात माझा आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म थोडक्यात हुकला, याचे दु:ख झाले. आता आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाला गवसणी घालण्याचे माझे एकमेव लक्ष्य आहे. मात्र त्यासाठी मला पुरुषांच्या स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल,’’ अशी इच्छा गोव्याची पहिली महिला ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवणारी भक्ती कुलकर्णीने व्यक्त केली. दक्षिण कोरियातील इनचॉन येथे झालेल्या आशियाई इन्डोअर क्रीडा बुद्धिबळ स्पर्धेत भक्तीने सांघिक जलद प्रकारात रौप्यपदक तर वैयक्तिक क्लासिकल प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले.
‘‘इनचॉन येथे ३ जुलैला ही स्पर्धा सुरू होणार असून २९ जूनला दिमाखदार उद्घाटन सोहळा रंगणार आहे, असे संकेतस्थळावरून आम्हाला समजले. त्यासाठी आम्ही चार जणींनी २७ जूनला तेथे जाण्याचे ठरवले. पण तिथे पोहोचल्यावर ही स्पर्धा ३० जूनला सुरू होणार आहे, हे ऐकून आम्हाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. कमी दिवसांत जुळवून घेणे कठीण होते. त्यातच सात दिवसांत क्लासिकल, जलद आणि ब्लिट्झ अशा तीन प्रकारच्या स्पर्धामध्ये खेळावे लागणार होते. एका दिवसाला दोन फेऱ्या असा जवळपास दहा तासांचा भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला जेवणासाठीही वेळ मिळत नव्हता. पण सहकाऱ्यांनी आत्मविश्वास उंचावल्यामुळे आम्ही पदकापर्यंत मजल मारू शकलो,’’ असे सांगताना तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या स्पर्धेतील कामगिरीविषयी ती म्हणाली, ‘‘आशियाई इन्डोअर स्पर्धेत मी कांस्यपदक पटकावले आहे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. मी प्रचंड आनंदी आहे. महिलांमधील हे माझे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक आहे. होऊ यिफान या चीनच्या महिला जागतिक विजेत्या खेळाडूसह मी बक्षिस स्वीकारण्यासाठी उभी होते, हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण होता. पण या स्पर्धेत आम्हाला भारताच्या झेंडय़ाखाली उतरता आले नाही, याची खंत वाटते. भारताचे नाव किंवा तिरंगा असलेल्या कोणत्याही वस्तू घालण्यास आमच्यावर प्रतिबंध होता. तिथेच आम्ही खचून गेलो होतो. पण प्रतिस्पध्र्याना कोणत्याही परिस्थितीत हरवायचे, याच इष्र्येने आम्ही खेळलो. दोन पदकांसह मायदेशी परतल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.’’
‘‘ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मला खेळात बरीच सुधारणा करावी लागणार आहे. कोनेरू हम्पी, डी. हरिका, तानिया सचदेव आणि सौम्या स्वामीनाथनसारख्या अव्वल खेळाडू असताना भारतीय संघात स्थान मिळणे कठीण आहे. त्यासाठी मला रेटिंगमध्ये सुधारणा घडवून आणावी लागेल,’’ असेहीभक्ती कुलकर्णीने सांगितले.
बुद्धिबळातील प्रवासाबद्दल भक्ती म्हणाली, ‘‘वडील बुद्धिबळपटू असल्यामुळे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी बुद्धिबळाकडे वळले. गोव्यात प्रशिक्षणाच्या फारशा सुविधा नव्हत्या. श्रीनिवास डेम्पो यांच्या गोवा कार्बन लिमिटेड कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यानंतर मला मुंबईला जाऊन द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले यांच्याकडून प्रशिक्षण घेता आले. त्याचबरोबर बेल्जियमच्या चिचेलो यांच्याकडूनही मी विशेष प्रशिक्षण घेतले आहे. आता एकापाठोपाठ यशाची शिखरे पादाक्रांत करण्याचे माझे ध्येय आहे.’’