इंग्लंडच्या कबड्डीतील वाटचालीबाबत फिलिप मोताराम आशावादी
इंग्लंडमधील बर्मिगहॅम प्रांत म्हणजे औद्योगिक क्रांतीचे माहेरघर. सध्याच्या घडीला बर्मिगहॅम इंग्लिश प्रीमिअर लीगमधील अॅस्टॉन व्हिला क्लब, क्रिकेटमध्ये एजबॅस्टन क्रिकेट मैदान, अॅथलेटिक्सचे जागतिक केंद्र असणारे अलेक्झांडर स्टेडियम अशा विविध खेळांसाठी प्रसिद्ध आहे. पण ‘बर्मिगहॅमचा कबड्डीपटू’ म्हटल्यावर विचित्र वाटतेय ना, पण हे खरे आहे. उंच, गोरा, निळ्या डोळ्यांचा २० वर्षीय फिलिप मोताराम प्रो कबड्डी स्पर्धेतील बंगळुरू बुल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
फिलिप बर्मिगहॅम विद्यापीठात राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. इंग्लंडमध्ये असंख्य विद्यापीठांमध्ये खेळांच्या यादीत कबड्डीचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यास सांभाळून खेळण्याची विद्यार्थ्यांना मुभा आहे.
कबड्डीशी परिचय कसा झाला विचारले असता फिलिप म्हणतो, ‘‘इंग्लंडमध्ये कबड्डीचा खेळ रुजवण्यात मूळच्या पंजाबच्या आणि इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या अशोक दास यांची भूमिका निर्णायक आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी इंग्लंडच्या सैन्याला कबड्डी खेळाची ओळख करून दिली. अशोक सध्या इंग्लंड कबड्डी संघाचे प्रशिक्षक आहेत. अशोक यांच्या माध्यमातूनच मी प्रो कबड्डीशी जोडला गेलो. लिलावाच्या वेळी बंगळुरू बुल्स संघाने मला खरेदी केले. तेव्हा माझा विश्वासच बसला नाही.’’
भारतात येऊन कबड्डी खेळण्याच्या अनुभवाविषयी विचारले असता फिलिप म्हणाला, ‘‘कबड्डी खेळण्याचे माझे पहिलेच वर्ष आहे. प्रो कबड्डीच्या निमित्ताने खेळातील बारकावे जाणून घेता आले. परिपक्व खेळाडू होण्याच्या दृष्टीने हा कालखंड महत्त्वाचा आहे. खेळासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. इंग्लंडमध्ये कबड्डीच्या स्पर्धा मोठय़ा प्रमाणावर होत नाहीत. मात्र प्रो कबड्डीत संधी मिळाल्यामुळे कबड्डीचे मूळ असलेल्या ठिकाणी येता आले. ही माझी पहिलीच भारत भेट आहे. चाहत्यांचा पाठिंबा प्रचंड असतो. माझी अंतिम संघात अद्याप निवड झालेली नाही. पण जेव्हा संधी मिळेल, तेव्हा संघाला जिंकून देण्यासाठी झोकून देईन. इंग्लंडमध्ये आम्हाला शारीरिकदृष्टय़ा आक्रमक स्वरूपाच्या खेळांची सवय नाही. कबड्डीमुळे सर्वस्वी नवीन विश्व अनुभवायला मिळाले.’’
‘‘भारतीय पदार्थाची चव खमंग आहे. वेगवेगळे नवीन पदार्थ पहिल्यांदाच खातो आहे, मजा येते. सुदैवाने पोटाने साथ दिली आहे. भारतीय लोकांची संस्कृती अनोखी आहे. भटकण्याची इच्छा आहे. मात्र स्पर्धेचे वेळापत्रक आणि सुरक्षा यामुळे बाहेर पडता येत नाही,’’ असे फिलिपने सांगितले.
ब्रेग्झिटमुळे इंग्लंड आणि संलग्न देशांतील फुटबॉलपटूंना वेगळे पर्याय शोधावे लागणार आहेत. मात्र कबड्डीला फटका बसेल असे वाटत नाही. इंग्लंडमध्ये स्थायिक भारतीय नागरिकांची संख्या खूप आहे. त्यांनी हातभार लावल्यास प्राथमिक अवस्थेत असणारी इंग्लंडची कबड्डी दमदार वाटचाल करू शकेल, असा विश्वास फिलिपने व्यक्त केला.