नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती पूजा राणी (७५ किलो), जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारी लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांच्यासह भारताच्या अन्य दोन महिला बॉक्सरनी रशियात सुरू असलेल्या मगोमेद सलाम उमाखानोव्ह स्मृती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
लव्हलिना हिने रशियाच्या अॅनास्तेशिया सिगाएव्हा हिचा ५-० असा धुव्वा उडवत आपले पदक निश्चित केले आहे. तिला उपांत्य फेरीत बेलारूसच्या अलिना वेबेर हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पूजा राणीने रशियाच्याच लॉरा मामेदकुलोव्हा हिचा ४-१ असा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती पिंकी जांगरा (५१ किलो) हिला मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तिला बेलारूसच्या युलिया अपानासोव्हिच हिने ०-५ असे सहज हरवले. महिलांमध्ये इंडिया खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या नीरजा (५७ किलो) हिने रशियाच्या सयाना सागातेएव्हा हिला ४-१ अशी धूळ चारली. जागतिक युवा स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेती जॉनी (६० किलो) हिने बेलारूसच्या अॅनास्तेशिया ओबुशेंकोव्हा हिला ५-० असे पराभूत केले.
पुरुषांमध्ये आशिष इंशा (५२ किलो) याने अझरबैजानच्या सलमान अलिझेड याचे आव्हान ४-१ असे सहज परतवून लावले. गौरव सोलंकी (५६ किलो), गोविंद सहानी (४९ किलो) आणि संजीत (९१ किलो) यांनीही उपांत्य फेरीत स्थान मिळवले.