एकेकाळी क्रिकेटच्या मैदानात आपल्या गोलंदाजीने पट्टीच्या फलंदाजांना हैराण करणारा ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली सध्या भारतामध्ये आहे. तो कर्नाटक प्रीमीयर लीगमध्ये समालोचन करताना दिसतोय. क्रिकेटच्या मैदानातील या दिग्गजाने नुकतेच कुस्तीच्या आखाड्यात आपले कसब दाखवले. ‘स्टार स्पोर्टस’ने ब्रेट लीला मेंशन करुन हा व्हिडिओ ट्विट केलाय. कुस्ती खेळतानाचा त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये ब्रेट ली निळ्या रंगाचा टी-शर्ट घालून आखाड्यात प्रवेश करताना दिसतो. त्यानंतर एखाद्या कसलेल्या मल्लाप्रमाणे तो खाली वाकून लाल मातीला नमस्कार करताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ब्रेट ली याने आखाड्यात उतरल्यानंतर अवघ्या ३२ सेकंदात प्रतिस्पर्धी पहिलवानाला चीतपट केले. याशिवाय, ब्रेट लीने कन्नड भाषेतील एक व्हिडिओही ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत तो कन्नड भाषेत बोलताना दिसत आहे. कर्नाटक प्रिमीअर लीगमधील सामन्यांच्या समालोचनासाठी ब्रेट ली बराच काळ कर्नाटकमध्ये राहिला आहे. या काळात तो कन्नड भाषा उत्तम बोलायला शिकल्याचे व्हिडिओवरून दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त ब्रेट ली अनेक गोष्टींमुळे कायमच चर्चेत राहिला आहे. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासोबत गायलेल्या हिंदी गाण्यामुळे ब्रेट लीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने भारताविरुद्ध १२ कसोटी सामन्यांमध्ये ५३ बळी घेतले आहेत, तर ३२ वन-डे सामन्यांमध्ये भारताविरुद्ध खेळताना ब्रेट लीच्या खात्यावर ५५ बळी जमा आहेत.