फिलिप ह्युजेसच्या हृदयद्रावक मृत्यूमुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू शोकसागरात बुडून गेले आहेत. या घटनेचे साक्षीदार असलेले अनुभवी क्रिकेटपटू शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर आणि ब्रॅड हॅडिन यांनी आम्ही स्पर्धात्मक क्रिकेटसाठी मानसिकदृष्टय़ा अद्याप सावरलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचे पुनर्नियोजन करण्यात येणार आहे.
आठवडय़ाभरात ब्रिस्बेन येथे ४ डिसेंबरपासून पहिली कसोटी सुरू होणार आहे. परंतु खेळाडूंना या घटनेचा तीव्र धक्का बसला आहे आणि यातून सावरण्यासाठी त्यांना पुरेसा अवधी देणे महत्त्वाचे आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी सांगितले. याचप्रमाणे ‘दी ऑस्ट्रेलियन’ने दिलेल्या माहितीनुसार, अॅडलेड येथे (१२ ते १६ डिसेंबर) होणारी दुसरी कसोटी आणि मेलबर्न येथे (२६ ते ३० डिसेंबर) होणारी तिसरी कसोटी या दरम्यानच्या कालावधीत पुढे ढकलण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचे नियोजन करण्यात येईल.
ह्युजेसच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याचे पार्थिव त्याच्या घरी मॅक्सव्हिले येथे नेण्यात येणार आहे. जर खेळाडू तिथे हजर राहिले तर, पुढील दिवशी सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याकडे लक्ष केंद्रित करणे त्यांना कठीण जाईल.
‘‘खेळाडूंच्या अतिशय जवळची व्यक्ती त्यांना सोडून गेली आहे. या शोकप्रक्रियेतून ते जात असताना त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा. सहा किंवा सात दिवस हा फार मोठा काळ नक्कीच नाही,’’ असे सदरलँड यांनी सांगितले.
डावखुरा फलंदाज ह्युजेसची मृत्यूशी झुंज गुरुवारी संपली, त्यावेळी क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली. सीन अॅबॉटचा उसळता चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे मंगळवारी त्याला तातडीने सेंट व्हिन्सेंट इस्पितळात दाखल करण्यात आले होते. भारताचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध दुसरा सराव सामना अॅडलेड येथे शुक्रवार-शनिवारी होणार होता. परंतु तो या घटनेमुळे रद्द करण्यात आला आहे.
डोक्याला चेंडू लागून ह्युजेस कोसळला, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील चार खेळाडू डेव्हिड वॉर्नर, ब्रॅड हॅडिन, शेन वॉटसन आणि नॅथन लिऑन तिथे उपस्थित होते. गुरुवारी रात्री सर्वच खेळाडू सिडनी क्रिकेट ग्राऊंडपाशी श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते. यावेळी कर्णधार मायकेल क्लार्कने सर्वाशी चर्चा केली. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी ते तयार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
‘‘फिलिपच्या वडिलांशी माझा संवाद झाला, त्यावेळी त्यांनी ह्युजेस कुटुंबीयांच्या क्रिकेटवरील प्रेमाची महती सांगितली. फिलिपचेही खेळावर जीवापाड प्रेम होते. त्यामुळे खेळ चालू राहावा, हीच त्याचीसुद्धा इच्छा असली असती, असे वडिलांनी बोलून दाखवले,’’ असे सदरलँड म्हणाले.
‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) आमची सातत्याने चर्चा होत आहे. त्यांना आमच्या भावनांची योग्य जाणीव आहे. पहिली कसोटी योग्य वेळेत सुरू करायची झाल्यास संघाला वेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागणार आहे,’’ असे सदरलँड यांनी सांगितले.
दरम्यान, फिल ह्य़ुजेसला आदरांजली वाहत भारतीय संघाने शुक्रवारी काळ्या फिती लावून सराव केला. भारतीय खेळाडूंनी या वेळी मुख्य मैदानात जाऊन सराव केला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेटवर शोककळा!
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिलिप ुजेसने गुरुवारी जगाचा निरोप घेतल्यामुळे क्रिकेटजगतावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी ुजेसला सर्वत्र श्रद्धांजली वाहण्यात आली. ुजेस ज्याच्या चेंडूमुळे मैदानावर कोसळला, त्या सीन अॅबॉटला या धक्क्यातून सावरण्यासाठी सारे सरसावले आहेत, तर पहिल्या कसोटी सामन्याचे पुनर्नियोजन होण्याची शक्यता आहे.

कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आग्रही
ब्रिस्बेनला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा पहिला कसोटी सामना नियोजित कार्यक्रमानुसार सुरू व्हावा, जेणेकरून क्रिकेटपटू आणि चाहत्यांना फिलिप ह्युजेसच्या मृत्यूमुळे झालेले दु:ख प्रकट करण्यास मदत होईल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलर म्हणाला, ‘‘या परिस्थितीतून सावरणे क्रिकेटपटूंसाठी अत्यंत कठीण गोष्ट आहे. परंतु वेदना शमविण्यासाठी क्रिकेट हे सर्वोत्तम औषध आहे. ह्युजेस घटनेच्या वेळी मैदानावर असणाऱ्या खेळाडूंशी चर्चा करण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी सावरणे हे आव्हानात्मक असेल.’’ ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल म्हणाले, ‘‘या कठीण परिस्थितीमध्ये पहिली कसोटी खेळणे, हा सर्वोत्तम मार्ग मला वाटतो.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brisbane test all set to be rescheduled warner watson not ready
First published on: 29-11-2014 at 05:56 IST