भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आणि वैयक्तिक फलंदाजी या दोन्ही गोष्टींचा मी स्वतंत्रपणे विचार करतो. मी कधीही या दोन गोष्टींना एकत्र आणण्याची गल्लत करत नाही. त्यामुळे मला संघाचे कर्णधारपद सांभाळताना स्वत:मध्ये बदल करावे लागले नाहीत, असे भारताचा संघनायक विराट कोहलीने सांगितले. श्रीलंकेतील आगामी कसोटी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्याने बुधवारी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करू, असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात अनेक तरूण खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय, विराट कोहलीही कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्यांदाच एखाद्या आव्हानाला सामोरा जाणार आहे. त्यामुळे हा दौरा भारताच्यादृष्टीने खडतर मानला जात आहे. परंतु, भारताप्रमाणे श्रीलंकन संघाचीही नव्याने बांधणी होत आहे. दोन्ही संघातील तरूण खेळाडुंनी गेल्या काही काळात चांगली कामगिरी करून दाखविली आहे. त्यामुळे ही कसोटी मालिका नेहमीप्रमाणे चुरशीची होईल, असे विराट कोहलीने म्हटले. या कसोटी मालिकेतील गॅले येथील दुसऱ्या् सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगाकारा निवृत्ती घेणार आहे. कदाचित त्यामुळे तिसऱ्या कसोटीत लंकेचा संघ अडचणीत येऊ शकतो, असे विराटने यावेळी सांगितले. भारतीय संघाला १९९३ नंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्यात यश आलेले नाही. याबद्दल विचारण्यात आले असता विराटने मी पूर्वीच्या आकडेवारीकडे लक्ष देणार नसल्याचे सांगितले. आमचे संपूर्ण लक्ष फक्त चांगला खेळ करण्यावर केंद्रित असेल, असे त्याने म्हटले. मी जेव्हा पहिल्यांदा श्रीलंकेत एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी आलो होतो, तेव्हाही मला भारताने गेल्या २५ वर्षांत याठिकाणी एकही मालिका जिंकली नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर मी कधीही या गोष्टीचे दडपण घेतले नव्हते. कारण, आम्ही याठिकाणी फक्त चांगले क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. प्रत्येक मालिकेसाठी आम्ही रणनिती आखतो आणि पुढील पाच-सहा वर्षे आम्ही अशाचप्रकारे खेळण्याचे आम्ही ठरवल्याचे विराटने यावेळी सांगितले.