जागतिक क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक हे कारकीर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन असल्याचे मुंबईकर स्नूकरपटू आदित्य मेहताने सांगितले. चीनचा मातब्बर खेळाडू आणि जेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या लिआंग वेन्बोवर मात करत आदित्यने सुवर्णपदकाची कमाई केली.
‘‘कारकीर्दीतील आतापर्यंतचे माझे सवरेत्कृष्ट प्रदर्शन आहे. या विजयाने प्रचंड आनंद झाला आहे. मंगळवारचा दिवस माझ्यासाठी विशेष होता. अनेक दिवसांपासून जपलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे,’’ असे आदित्यने ‘ट्विटर’वर म्हटले आहे.
१९८१मध्ये पहिल्यावहिल्या जागतिक क्रीडा स्पध्रेमध्ये बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर या स्पर्धेत पदकावर नाव कोरणारा आदित्य केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. २०१०साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य तसेच कांस्यपदक पटकावणाऱ्या आदित्यने पाचदिवसीय स्पर्धेत शानदार फॉर्म दाखवताना सुरेख खेळ केला.