विश्वचषकाच्या पहिल्या फेरीचा उत्तरार्ध जसजसा समीप येऊ लागला, तसतशी स्पध्रेतील एकेक दिग्गज संघांची नावे गळायला लागली आहेत. ३२ संघांपैकी १६ संघ आता जवळपास निश्चित झाली आहेत. या पाश्र्वभूमीवर राजीनामासत्र सुरू झाले आहे. बुधवारी इटलीचे प्रशिक्षक सेसार प्रान्डेली आणि आयव्हरी कोस्टचे प्रशिक्षक सबरी लॅमोची यांनी राजीनामे दिले. गुरुवारी त्यात जपानचे प्रशिक्षक अल्बेटरे झ्ॉचेरोनी आणि होंडुरासचे प्रशिक्षक लुइस सुआरेझ या आणखी दोन नावांची भर पडली आहे. तथापि, इंग्लंडचे प्रशिक्षक रॉय हॉजसन यांनी आपण पद सोडण्याच्या स्थितीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. फुटबॉलविश्वातील याच (ना)राजीनाम्यांचा घेतलेला वेध-
जपानच्या पराभवानंतर झॉचेरोनी यांचा राजीनामा
टोकियो : विश्वचषकाच्या पराभवाची पूर्णपणे जबाबदारी घेत जपानचे प्रशिक्षक अल्बेटरे झ्ॉचेरोनी यांनी राजीनामा दिला आहे. ‘‘मी जपानच्या कामगिरीने निराश झालो आहे आणि विश्वचषकात आमच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी झालेली नाही. यंदा विश्वचषकात आम्ही दुसऱ्या फेरीत पोहोचू, अशी मला अपेक्षा होती आणि अपेक्षेनुरूप कामगिरी संघाला करता आली नाही. त्यामुळे या पराभवाची पूर्णपणे जबाबदारी मी घेऊन प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत आहे.’’
होंडुरासचे प्रशिक्षक सुआरेझ यांचा राजीनामा
मनाऊस : विश्वचषकातील तिन्ही सामने होंडुरासला गमवावे लागले. यंदाच्या विश्वचषकात एकाही सामन्यात विजय न मिळाल्यामुळे होंडुरासचे प्रशिक्षक लुइस सुआरेझ यांनी राजीनामा दिला आहे. ‘‘मी विश्वचषकामध्ये संघाकडून बरीच स्वप्ने पाहिली होती. पण ही सारी स्वप्ने धुळीस मिळाली. माझ्याकडूनच चुका झाल्या असे मला वाटते, कारण संघाची रणनीती मीच ठरवत होतो. त्यामुळे या चुकीची दखल घेऊन राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.’’
हॉजसन यांचा राजीनामा नाही
रिओ द जानिरो : विश्वचषकातून संघ बाहेर पडला की त्या शल्याचे पर्यवसान राजीनाम्यामध्ये होत असल्याचे आपण पाहत असलो तरी इंग्लंडचे प्रशिक्षक रॉय हॉजसन यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. पराभवानंतरही इंग्लंडच्या फुटबॉल संघटनेने त्यांना प्रशिक्षकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘‘इंग्लंडच्या संघटनेने मला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, हे ऐकून खूप आनंद झाला आहे. या पराभवापासून मला पळ काढायचा नाही तर या टीकांना उत्तर देण्याची मला संधी मिळाली आहे,’’ असे हॉजसन यांनी सांगितले.