जागतिक स्तरावरील ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजविणाऱ्या व्हीनस विल्यम्स, मार्टिना हिंगिस, पॅट कॅश या अव्वल दर्जाच्या खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. २३ व २४ नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती क्रीडानगरीत चॅम्पियन्स टेनिस लीगचे सामने होणार आहेत. त्यामध्ये हे खेळाडू भाग घेत आहेत.
स्पर्धेत सहभागी झालेल्या पुणे मराठाज या फ्रँचाईजीच्या बोधचिन्हाचे अनावरण तसेच अभिनेता श्रेयस तळपदे याला या फ्रँचाईजीचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून घोषित करण्याचा कार्यक्रम येथे स्पर्धेचे संस्थापक विजय अमृतराज यांच्या हस्ते झाला. या वेळी फ्रँचाईजीचे मालक मिलिंद ताम्हाणे, राज्य लॉनटेनिस संघटनेचे सरचिटणीस सुंदर अय्यर, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रकाश अमृतराज, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ हे उपस्थित होते.
या स्पर्धेनिमित्त लोपेझ फिलिसिआनो, मिखाईल युझेनी, थॉमस एनक्विस्ट, माकरेस बघदातीस आदी दर्जेदार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी पुणे मराठाज संघाची हैद्राबाद संघाशी गाठ पडणार आहे, तर २४ नोव्हेंबर रोजी पुण्याची बंगळुरू संघाबरोबर लढत होईल. प्रत्येक लढतीत पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी, मिश्रदुहेरी, ज्येष्ठ खेळाडूंचा एकेरीचा सामना अशा पाच सामन्यांचा समावेश असेल. प्रत्येक सामना एकच सेटचा राहणार आहे.
या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना परदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी मिळेल. अशा संधीचा लाभ घेत भारतीय खेळाडूंनी ग्रँड स्लॅम एकेरीत विजेतेपद मिळवावे अशी अपेक्षा श्रेयस याने या वेळी व्यक्त केली. आमच्या लहानपणी आमच्यासाठी अमृतराज बंधु खूप आदर्श होते. त्यांच्यामुळेच आपल्या देशात टेनिसला लोकप्रियता मिळाली.
पुणे मराठाज संघाची मालकी मायस्पोर्ट्स संस्थेने स्वीकारली आहे. या संस्थेचे संचालक मिलिंद ताम्हाणे म्हणाले, आमच्या संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. आमच्या संघाने पदार्पणातील ही स्पर्धा जिंकावी अशीच माझी अपेक्षा राहील. या स्पर्धेद्वारे चाहत्यांना खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2014 रोजी प्रकाशित
पुणेकर टेनिस प्रेमींसाठी मेजवानी
जागतिक स्तरावरील ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजविणाऱ्या व्हीनस विल्यम्स, मार्टिना हिंगिस, पॅट कॅश या अव्वल दर्जाच्या खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. २३ व २४ नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती क्रीडानगरीत चॅम्पियन्स टेनिस लीगचे सामने होणार आहेत.
First published on: 12-11-2014 at 02:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champion tennis league give opportunity to watch world class tennis players