डॅनी अ‍ॅल्व्हिस आणि मारियो मँडझुकिक यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर युव्हेंट्स क्लबने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या परतीच्या लढतीत युव्हेंट्सने २-१ अशा फरकाने मोनॅकोवर मात केली आणि गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.

युव्हेंट्सने उपांत्य फेरीच्या पहिली लीग लढत २-० अशी जिंकली होती. परतीच्या लढतीत ३३व्या मिनिटाला मँडझुकिकने युव्हेंट्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अ‍ॅल्व्हिसने ४४व्या मिनिटाला भर टाकून युव्हेंट्सचा अंतिम फेरीतील प्रवेशावर ४-१ अशी शिक्कामोर्तब केले. ३४वर्षीय अ‍ॅल्व्हिसने या लढतीत अप्रतिम खेळ करून चाहत्यांची मने जिंकली.

‘‘तीन महिन्यांपूर्वी काही लोक डॅनी अ‍ॅल्व्हिसच्या गळचेपीच्या प्रयत्नात होती. पण तो एक चांगला खेळाडू आहे. त्याचा शोध आम्ही तीन महिन्यांत लावलेला नाही. त्याच्या नावावर २९ जेतेपद आहेत आणि अशा खेळाडूचा प्रशिक्षक असल्याचा मला अभिमान आहे,’’ असे मत युव्हेंट्सचे प्रशिक्षक मॅसिमिलियानो अ‍ॅलेग्री यांनी व्यक्त केले.

मोनॅकोकडून कॅलियन बप्पेने (६९ मि.) एकमेव गोल केला. या गोलबरोबर त्याने नव्या विक्रमाचीही नोंद केली. चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत गोल करणारा बप्पे (१८ वर्ष आणि १४० दिवस) हा युवा खेळाडू बनला आहे. दोन वर्षांपूर्वी युव्हेंट्सला अंतिम फेरीत बार्सिलोनाकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. या मोसमात युव्हेंट्सला जेतेपदासाठी रिअल माद्रिद व अ‍ॅटलेटिको माद्रिद यांच्यातील विजेत्याशी सामना करावा लागणार आहे.