चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करुन भारताने एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना पाकिस्तानमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांकडून पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि राजकिय नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचा हा पराभव वेदनादायी होता, अशी भावना त्यांनी ट्विटवरुन व्यक्त केली. इम्रान खान यांनी ट्विटरवर लिहिलंय की, खिलाडूवृत्तीची मला जाणीव आहे. त्यामुळे विजय आणि पराभव हा खेळाचा भाग असतो हे मला मान्य आहे. पण पाकिस्तानने भारताविरुद्ध संघर्ष न करता पराभव पत्करला. त्यामुळे हा पराभव वेदना देणारा असाच होता.

पाकिस्तानच्या पराभवानंतर इम्रान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डामधील कार्यपद्धतीवरही निशाणा साधला. पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. मात्र, ही सुधारणा होईपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळाच्या स्तरातील अंतर आणखी वाढेल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे जलदगती गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरले. गोलंदाजांनी निराश केल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी देखील नांगी टाकल्याचे दिसले. सलामीवीर अझर अली (५०) आणि मोहम्मद हाफीज (३३) यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज बर्मिंगहॅमच्या मैदानात तग धरु शकला नाही. परिणामी पाकिस्तानचा संघ ३३.४ षटकांत १६४ धावांत गारद झाला. डकवर्थ लुईस नियमानुसार, भारताने हा सामना १२४ धावांनी जिंकला.