ईशांत शर्मा, आर. अश्विन, रविंद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी आपल्या गोलंदाजीची जादू कार्डिफच्या मैदानावर गुरुवारी दाखवली आणि श्रीलंकेचा संघ ५० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १८१ धावांत तंबूत परत पाठवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतापुढे १८२ धावांचे आव्हान ठेवले आहे.
ईशांत आणि अश्विनची गोलंदाजी टीम इंडियासाठी उपयुक्त ठरली. दोघांनी श्रीलंकेचे प्रत्येकी तीन मोहोरे टिपले. कुमार संगकारा, लाहिरू थिरिमाने, थिसारा पेरेरा यांना ईशांतने बाद केले. आर. अश्विनने ऍंजलो मॅथ्युज, नुवान कुलशेखरा आणि जीवन मेंडिस यांना बाद केले.
मॅथ्यूज वगळता श्रीलंकेचा कोणताच फलंदाज मैदानावर चमकदार कामगिरी करू शकला नाही. मॅथ्यूजने एक चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने ५१ धावा केल्या. महेला जयवर्धनने ३८ धावा काढून त्याला चांगली साथ दिली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना नियोजित वेळेपेक्षा उशीरा सुरू झाला.