क्रिेकेट सामन्यानंतर एका स्त्री पत्रकाराला मुलाखत देताना ख्रिस गेलचा शाब्दिक तोल ढळला आणि तो सार्वजनिक पातळीवर जे बोलू नये ते बोलला. असं काहीही घडणं आश्चर्याचं, नावीन्यपूर्ण अजिबात नाही. कारण स्त्रियांना गृहीत धरायची पुरुषांना सवयच आहे.

ख्रिस गेल हे क्रिकेटजगतातलं एक लोकप्रिय नाव. वेस्ट इंडिजचा हा आघाडीचा फलंदाज त्याच्या मैदानावरील फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे, तसा मदानाबाहेरच्या देखील. त्याने हे नुकतंच सिद्धही केलंय. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० स्पध्रेदरम्यान एका सामन्यानंतर एका पत्रकार स्त्रीला मुलाखत देताना त्याने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तोल सुटला. तो सपशेल घसरला. ‘तू १५ चेंडूंत ४१ धावा कशा केल्यास?’ या त्या बातमीदार स्त्रीच्या प्रश्नाला बगल देत तो तिच्या डोळ्यांच्या सौंदर्याचं कौतुक करत राहिला. ‘सामन्यानंतर तुला मुलाखत द्यायला मिळावी, म्हणूनच ही कामगिरी केली,’ असं अगोचर उत्तरही त्यानं दिलं. समोरची पत्रकार कसंनुसं हसली त्यावर; पण या ख्रिस बाप्याची फटकेबाजी संपली नव्हती आणि त्याची घसरण इथेच थांबली नाही, तर ‘डोण्ट ब्लश बेबी.. हा सामना संपल्यानंतर तुझ्याबरोबर िड्रक्स घ्यायला आवडेल’ असंही तो म्हणाला. या मुलाखतीचं थेट प्रक्षेपण होतंय, याची पुरती जाणीव त्याला होती. तरीही तो असं वागला आणि हे बरळला. समोरच्या रिपोर्टरनं त्यावर तातडीनं रिअ‍ॅक्ट न होता तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. ख्रिस गेलला तरीही आपण काही विचित्र बोललो, मूर्खासारखं बोललो हे लक्षात आलं नसावं. आपण काय बोललो, कसं बोललो याचं गांभीर्य गेलच्या लक्षात आलं, सोशल मीडियावर त्वरित उमटू लागलेल्या प्रतिक्रियांवरून. त्याच्या या वागण्यावर आणि बोलण्यावर ‘सेक्सिस्ट’ असल्याच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्यावर त्याला चूक जाणवली असावी. ‘मी केवळ विनोद करण्याचा प्रयत्न केला,’ असं सांगून मनात तसं काही नव्हतं वगरे सांगायचा प्रयत्न गेलनं करून पाहिला आणि रीतसर माफीही मागितली. सामन्यानंतर त्याच्या या वर्तणुकीबद्दल गेलला त्याच्या क्लबाकडून दंडही आकारण्यात आला.

इथे विषय एकटय़ा ख्रिस गेलचा नाही. एकूणच समाजात स्त्रियांविषयी असलेल्या भावनांचा आहे. आपल्याकडे तर अशी ‘सेक्सिस्ट’ शेरेबाजी ऐकू येते. कधी सार्वजनिक ठिकाणी तर कधी खासगीत, प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी याचा अनुभव आलेला असेल. स्त्रीला काहीही बोललं तरी चालतं. ती कुणीही असो, काहीही करत असो, तिची पहिली ओळख समाजाला एक ‘स्त्री’ अशीच असते. तीच ओळख महत्त्वाची असते, कारण त्यामुळे तिला ‘गृहीत’ धरता येतं. असं गृहीत धरायचंच असतं. तिच्यामागे मग अबला, सेक्सी, चारित्र्यवान, वाईट चालीची, शालीन, लूज अशी सोयीस्कर किती तरी विशेषणं लावता येतात. आपापल्या वकुबाप्रमाणे, अशी विशेषणं लावण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. केवळ पुरुष नाही, या बाबतीत स्त्रियादेखील आघाडीवर असतात. दुसऱ्या स्त्रीच्या (सो कॉल्ड) चारित्र्यावरच आधी संशय घ्यायचा. कारण बाईचं शील हे सर्वस्व असतं म्हणे. चारित्र्य साफ हवं. बाकी काही असो, ही आपली अट. अट घालणाऱ्याच्या चारित्र्याविषयी मात्र विचारायचं नाही.

समानतेचं युग असं एकीकडे म्हणायचं आणि हे असं स्त्रीला केवळ ती स्त्री आहे म्हणून गृहीत धरायचं? ख्रिस गेलच्या समोर मुलाखत घेण्यासाठी केवळ एक स्त्री नव्हती तर एक पत्रकार उभी होती. त्याला मात्र केवळ तिचं स्त्री असणंच दिसलं. असे किती तरी ख्रिस गेल आपल्या समाजात, अगदी आपल्या आसपास वावरत असतात. ख्रिस गेलचं संभाषण टीव्हीवर लाइव्ह दिसलं, म्हणून त्याची चर्चा झाली. त्याला माफी मागावी लागली. आपलं शौर्य दाखवायला, आपली हिणकस विनोदबुद्धी दाखवायला, आपली जिगर दाखवायला आणि आपली स्टंटबाजी दाखवायला हे उत्सुक फटकेबाज तयार असतात.

एका मत्रिणीला आलेला अनुभव.. तिचा बॉस इथे ख्रिस गेलच्या भूमिकेत होता. तो बॉस आहे आणि समोरची स्त्री आहे, हे एवढं नातं गृहीत धरायला पुरेसं असतं. ही मत्रीणदेखील शिकलेली, मॅनेजर झालेली. ती कुठलीशी शंका विचारायला बॉसकडे गेली. हा सर्वासमक्ष तिने घातलेल्या ड्रेसवर कमेंट करू लागला. असं एक दिवस नाही, दोन-तीन वेळा झाल्यावर तिने सर्वासमक्ष एकदा बॉसला सुनावलं- की, आपण माझ्या ड्रेसवर चर्चा करण्यापेक्षा प्रोजेक्ट वर्कवर प्रतिक्रिया दिलीत तर बरं होईल. माझा ड्रेसिंग सेन्स हा वैयक्तिक मामला आहे. या बॉसची फटकेबाजी आणि घसरणही गेलसारखीच अधिकाधिक घसरत जाणारी ठरली. कारण त्यावर त्यानं अकलेचे तारे तोडलेच, ‘स्त्रीच्या सौंदर्याला दाद देणं हे रसिकतेचं लक्षण आहे. तुम्ही स्त्रिया पुरुषांनी लक्ष द्यावं म्हणून तर नटता ना.. तुलाही बरंच वाटेल ना माझं कौतुक ऐकून. तुला कामात एन्करेजमेंट मिळेल.’ ही मुक्ताफळं ऐकणाऱ्यांमध्ये किमान अर्धा डझन स्त्रिया होत्या. त्यातल्या एकीनंही यावर अवाक्षर काढलं नाही. तो बॉस आहे आणि त्याच्या समोर एक स्त्री उभी आहे. हे असं होणारच. असतात अशी माणसं समाजात. किती किती म्हणून गृहीत धरलंय आपण! एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याची चर्चा ही अशी तिच्यासमक्ष क्षणात सार्वजनिक केली या बॉसनं. ऑफिस हे त्याच्या रसिकतेची पावती देण्याचं ठिकाण नक्कीच नाही, हा एक भाग आणि आपण जिच्याबद्दल बोलतोय, तिला ही अशी सार्वजनिक स्तुती (खरं तर अस्थानी स्तुती) आवडणार आहे का, आपण तिला गृहीत धरणं बरोबर आहे का, हे असे प्रश्न पडण्याइतकी परिपक्वता आणि समज आपल्या समाजात अजून आलेलीच नाही, हेच सत्य आहे.

बहुधा प्रत्येक स्त्रीला हे असे घसरणारे फटकेबाज अधूनमधून भेटत असतात. समोरच्याचं हे वागणं सेक्सिस्ट आहे, हे माहीत असूनही बऱ्याच स्त्रिया त्याविषयी काही थेटपणे बोलत नाहीत. ती व्यक्ती मानाने, हुद्दय़ाने किंवा वयाने मोठी असेल तर पुन्हा तिच्या थेट बोलण्याला मर्यादा येतात. कारण तिला हीच शिकवण दिलेली असते, मर्यादा सांभाळण्याची. पुन्हा शब्दाला शब्द लागून आधीच अवघडलेपणा वाटायला लावणारा विषय आणखी कशाला वाढवा, असाच सावध पवित्रा बहुतेक स्त्रिया अशा प्रसंगी घेतात. हळूहळू अशा सेक्सिस्ट कमेंट्सची सवयही होते. बायका बायकांमध्ये मग अशा पुरुषांचा उद्धार होतो. तो किती स्त्रीलंपट आहे, किती लक्ष ठेवून असतो वगरे.. पण तो विषय बायकांपुरता राहतो. त्या व्यक्तीला याबद्दल सुनावायची िहमत फार कमी स्त्रिया दाखवतात. आपण दूर राहायचं, असा शहाजोग सल्लाच दरवेळी दिला जातो.

शेवटी बाईचीच जबाबदारी ना सगळी. पुरुष असेच असणार. बाईनं कसं तिच्या मर्यादेत राहावं, हे आपलं बाळकडू. स्त्रीने तिच्या चौकटीत असावं मग आम्ही तिला शालीनतेची उपाधी लावणार. ‘औरत की इज्जत शिशे की तरह होती है. एक बार टूट जाएं तो फिर से नही जुडती..’ हे हमखास टाळ्यांचं वाक्य. असं म्हणत आपण बाईचं चारित्र्य आणि शील तिच्यातल्या व्यक्तीपेक्षाही मोठं करून ठेवलंय. बरं या सगळ्याला संस्कृती, परंपरांची झालर देऊन ठेवल्यानं ते चुकीचं कसं म्हणणार? संस्कृती, परंपरा हे शब्द आले की, सगळं काही आपोआपच उदात्त होऊन जातं. नाही का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अशा पुरुषी फटकेबाजीला उधाण येतं, जेव्हा समोरची स्त्री नेहमीपेक्षा (म्हणजे नेमकं काय? हे पुन्हा व्यक्ती, तिची समज, स्थल-कालपरत्वे सापेक्षच) थोडं मोकळंढाकळं बोलणारी, वागणारी असते. म्हणजे एखाद्या पुरुषाशी चार शब्द चांगल्या मानसिकतेतून आपणहून बोलायला जावं, तर त्याचा अर्थ समोरचा माणूस काय काढेल सांगता येत नाही. ही आपणहून बोलायला येतेय म्हणजे ही ‘अ‍ॅव्हेलेबल’ आहे, असा समज करून घेणारे अनेक जण असतात. स्त्रियांबरोबर काम करण्याची सवय नसणाऱ्यांची संख्या जास्त असेल, अशा ठिकाणी हा प्रश्न उद्भवतो. स्त्रियांची संख्या मुळात तोकडी असते अशा ठिकाणी आणि त्यामुळे आहेत त्यांच्यावर अनेकांची ‘नजर’ असते. ती कुणाशी, किती, काय बोलते याच्यावरून तिचं ‘कॅरॅक्टर’ ठरवणारे, तशी चारचौघांत (बऱ्याचदा शेलक्या शब्दात) शेरेबाजी करणारे ‘चरित्रकार’ही असतात. या चरित्रकारांचं स्वत:चं चरित्र काय आहे, हे त्यांना एकदा व्यवस्थित शब्दात सुनावायला नको का? काय हरकत आहे यासाठी त्या स्त्रीला पािठबा दिला तर? हे सगळं न पटणारे पुरुषही त्याच ठिकाणी वावरत असतील की.. असतातच आणि त्यांची संख्याच मोठी असते, यात वाद नाही. त्यांनीदेखील ही फटकेबाजी थांबवण्यात पुढाकार घेतला तर परिस्थिती नाही का सुधारणार? रेज युवर व्हॉइस नावाची एक जाहिरात मोहीम मध्यंतरी टीव्हीवर दिसायची. त्याला छेडछाडीचा संदर्भ होता. तुमच्या समोर कुणा मुलीची, स्त्रीची छेडछाड होताना दिसली तर ओरडा.. त्याला विरोध करा, असा संदेश त्यातून दिला जायचा. छेड काढणाऱ्याला ‘हे असं केलं तरी चालतं. कोण बोलणारे?’, असं समजू देऊ नका, असं या मोहिमेतून सांगितलं गेलं. तसंच स्त्रीला गृहीत धरू नका, असं ओरडून सांगणं आता आवश्यक झालंय. समानता मानणाऱ्या आपल्यातल्या प्रत्येकानं असा आवाज उठवला तरच हे गृहीत धरून फटकेबाजी करणं कमी होईल.
अरुंधती जोशी –