सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा पराभव करीत एटीपी सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेतील पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावले. या विजयाबरोबरच जोकोविचने सर्वच्या सर्व नऊ मास्टर्स १००० स्पर्धा जिंकण्याचा एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर नोंदवला आहे. १९९० पासून सुरु झालेल्या मास्टर्स प्रकारातील सर्व स्पर्धा जिंकणारा जोकोविच हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

जागतिक क्रमवारीमध्ये १०व्या क्रमांकावर असणाऱ्या जोकोविचने जागतिक क्रमावारीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या फेडररचा सरळ सेटमध्ये पराभव करत अगदी सहज हा सामना खिशात घातला. ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये फेडररचा पराभव करत पहिल्यांदात जोकोविचने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. याआधी याच स्पर्धेमध्ये जोकोविच एकूण पाच वेळा अंतिम सामने हरला होता. त्यापैकी तीनदा फेडररनेच त्याला हरवले होते. म्हणूनच जोकोविचचा हा विजय खास आहे.

यंदाच्या सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेतमध्ये सुरुवातीपासूनच जोकोविचने जेतेपदाला साजेशीच कामगिरी केली. उपांत्य फेरीमध्ये त्याने जागतिक क्रमवारीमध्ये सातव्या क्रमांकावर असणारा आणि मागील वर्षी या स्पर्धेचा विजेता ठरलेल्या क्रोएशियाच्या मारिन सिलिकचा पराभव केला. जोकोविच आणि सिलिकचा हा सामना तब्बल अडीच तास सुरु होता. अखेर जोकोविचने ६-४, ३-६, ६-३ अशा तीन सेटमध्ये हा सामना जिंकत अंतिम सामन्याचे तिकीट निश्चित केले. तर दुसरीकडे बेल्जियमचा खेळाडू डेविड गोफिनला दुखापत झाल्याने तो उपांत्य फेरीचा सामना खेळू शकला नाही. त्यामुळे फेडररला अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळाला होता.

जोकोविच आणि फेडरर यांच्या दरम्यान आत्तापर्यंत ४६ सामने झाले असून सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेतील विजयाबरोबरच जोकोविचने त्यापैकी २४ सामने जिंकले आहेत तर फेडररने २२ सामने जिंकले आहेत. यापैकी शेवटचे तिन्ही सामने जोकोविचनेच जिंकले आहेत हे विशेष. या ४६ पैकी ३४ सामने हे हार्ड कोर्टवर झाले असून त्यापैकी १८ सामने जोकोविच जिंकला आहे.

महिला एकेरीमध्ये किकि बर्टेंस हिने सिमोना हालेपला पराभवाचा धक्का देत एटीपी सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद आपल्या नावावर केले. किकिने सिमोनाचा २-६, ७-६, ६-२ असा पराभव केला.