आजपासून ऑस्ट्रेलिया-श्रीलंका यांच्यात पहिल्या कसोटीला प्रारंभ
दक्षिण आफ्रिकेने पर्थची निर्णायक कसोटी जिंकून जागतिक कसोटीमधील अव्वल स्थानाला गवसणी घातली. पण आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर आव्हान आहे ते श्रीलंकेचे. श्रीलंका कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. याचप्रमाणे मागील २५ वर्षांतील १० कसोटी सामन्यांत श्रीलंकेला ऑस्ट्रेलियन भूमीवर विजय मिळविता आलेला नाही. त्यामुळेच शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या दृष्टीने ऑसी कप्तान मायकेल क्लार्क आशावादी आहे. १६८ कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारा महान खेळाडू आणि उमदा संघनायक रिकी पॉन्टिंगच्या निवृत्तीनंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सामोरे जात आहे.
या सामन्यात बेन हिल्फेन्हॉस, पीटर सिडल आणि डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांच्यावर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याची प्रामुख्याने धुरा असेल, तर मध्यमगती गोलंदाज शेन वॉटसन आणि फिरकी गोलंदाज नॅथन लिऑन हे त्यांना साथ देतील. हिल्फेन्हॉस आणि सिडल संघात परतले आहेत. परंतु मिचेल जॉन्सनला मात्र शुक्रवारी अंतिम संघात स्थान मिळविता येणार नाही. ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने ४८ कसोटी सामन्यांत १९६ बळी घेतले आहेत. गेल्या आठवडय़ात पर्थ कसोटीतही त्याने ६ बळी घेतले होते.
ऑस्ट्रेलियाच्या संघात परतलेला फिल ह्युजेस तिसऱ्या क्रमांकावर, वॉटसन चौथ्या, कप्तान मायकेल क्लार्क पाचव्या आणि अनुभवी माइक हसी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल.
धडाकेबाज फलंदाज दिम्युथ करुणारत्ने अनुभवी तिलकरत्ने दिलशानसोबत श्रीलंकेच्या डावाला प्रारंभ करणार आहे. २४ वर्षीय करुणारत्ने आपल्या कारकिर्दीमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे. बेलव्‍‌र्हे ओव्हलच्या उसळणाऱ्या खेळपट्टीवर पहिली कसोटी रंगणार आहे.
न्युवान कुलसेकरा, शमिंदा इरंगा आणि चाणका वेलगेद्रा या तिघांवर श्रीलंकेच्या वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. डावुखरा फिरकी गोलंदाज रंगना हेराथ आणि मध्यमगती गोलंदाज अँजेलो मॅथ्यूस हेसुद्धा लंकेच्या दिमतीला असतील.
 प्रतिस्पर्धी संघ :
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, ईडी कोवान, फिल ह्य़ुजेस, शेन वॉटसन, मायकेल क्लार्क (कर्णधार), माइक हसी, मॅथ्यू व्ॉड, पीटर सिडल, मिचेल स्टार्क, बेन हिल्फेन्हॉस, नॅथन लिऑन, मिचेल जॉन्सन (१२वा खेळाडू)
श्रीलंका : तिलकरत्ने दिलशान, दिम्युथ करुणारत्ने, कुमार संगकारा, महेला जयवर्धने (कर्णधार), थिलान समरवीरा, न्यूवान कुलसेकरा, रंगना हेराथ, शमिंदा इरंगा, चाणका वेलगेद्रा.