न्यूझीलंडमधील राष्ट्रकूल स्पर्धेत अनेक भल्या भल्या मल्लांना लोळवून सुवर्णपदक मिळवलेले महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख (वय ५४) यांचे मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या विकाराने गुरूवारी दुपारी सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात निधन झाले. लाल मातीत कुस्त्या खेळून लौकिक मिळवेपर्यंत कुस्तीपटूंना संस्था, संघटना, शासन, दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत मिळते. परंतु हाच पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर गेला की एकाकी पडतो. आप्पालाल शेख यांच्या बाबतीतही दुर्दैवाने हेच घडले. शारिरिक व्याधी आणि आर्थिक विवंचनेमुळे विपन्नावस्थेत त्यांचा शेवट झाला.

सोलापूरजवळील बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आप्पालाल शेख यांनी १९९३ साली पुण्यातील कुस्ती अधिवेशनात संजय पाटील यांना आस्मान दाखवून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. महाराष्ट्र केसरी किताब मिळविणारे त्यांच्या घरातील तिघेजण आहेत. यापूर्वी त्यांचे थोरले बंधू इस्माईल शेख हे १९८० साली खोपोली येथे कुस्ती अधिवेशनात महाराष्ट्र केसरी झाले होते. त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख यांनी जालना येथे २००१-०२ साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. एकाच घरातून तिघे मल्ल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणारे बोरामणीचे एकमेव शेख कुटुंबीय आहे.

all the three parties in grand alliance fighting to take the lok sabha seat of nashik
भुजबळांचे विधान अन नाशिकमध्ये उमेदवारांच्या स्पर्धेत वाढ
What Uddhav Thackeray Said About Loksabha Election ?
उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

वडिलांनी दिला होता पाठिंबा

अल्पभूधारक असलेले शेकुंबर शेख यांना कुस्तीचा छंद असल्यामुळे त्यांनी आपली मुले इस्माईल व आप्पालाल यांना आर्थिक भार सोसत नसतानाही कुस्तीचे धडे घेण्यासाठी १९८५-८६ साली कोल्हापूरला शाहूपुरी तालमीत पाठवले होते. वस्ताद मोहम्मद हनीफ यांच्या तालमीत दोन्ही मुले तरबेज झाली. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे आणि वस्ताद मुकुंद करजगार यांनीही कुस्तीचे डावपेच शिकविले होते.

आप्पालाल शेख यांनी भल्या भल्या मल्लांना लोळवून लौकिक मिळवत महाराष्ट्र केसरीपर्यंत मजल मारली. एवढेच नव्हे त्याच सुमारास न्यूझीलंड येथे भरलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत आप्पालाल शेख यांनी भारतातर्फे प्रतिनिधित्व करताना ऑस्ट्रेलिया, इराण, बल्गेरिया व अन्य राष्ट्रांच्या मल्लांना लोळवले आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या मल्लाला आस्मान दाखवत सुवर्णपदकावर स्वतःचे नाव कोरले होते. ‘घिस्सा’ डाव टाकून कुस्ती जिंकणे ही आप्पालाल यांची विशेष हातोटी होती. महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

कुस्तीची घरातील परंपरा पुढे नेण्यासाठी आप्पालाल यांनी आपली मुले अश्फाक, अस्लम आणि गौस्पाक यांना कोल्हापूरला पाठवले होती. तेथे मुलांचा सराव सुरू असतानाच इकडे गावात आप्पालाल यांना मधुमेह बळावला आणि मूत्रपिंडाच्या विकाराने पछाडले. शासनाकडून मिळणारे मानधन तुटपुंजे आणि तेसुध्दा वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतीवर अवलंबून राहिलेल्या शेख कुटुंबीयांची परवड सुरू झाली. अशा विपन्नावस्थेत काही दानशूर मंडळींनी मदतीचा हात दिला. तर आपल्या पित्याची सेवा करण्यासाठी तिन्ही मुलांना कोल्हापूर सोडावे लागले. यातच तीन महिन्यांपूर्वी आप्पालाल यांच्या पत्नी साथ सोडून देवाघरी गेल्यामुळे ते आणखी खचले. यातच आजार बळावला आणि आप्पालाल यांचा शेवट झाला. सायंकाळी बोरामणी गावात त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले.