वृत्तसंस्था, बर्मिगहॅम : युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिननुंगाने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दोन विक्रम मोडीत काढत भारतासाठी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. २०१८च्या युवा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जेरेमीने पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १६० किलो असे एकूण ३०० किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले. सामोआचा वैपाव्हा नेव्हो इओआने याने २९३ किलो (१२७ किलो आणि १६६ किलो) वजनासह रौप्यपदक पटकावले. तर नायजेरियाचा एडिडिओंग जोसेफ उमोआफिआने २९० किलोसह (१३० किलो आणि १६० किलो) कांस्यपदक मिळवले.

१९ वर्षीय जेरेमीने स्नॅच (१४० किलो) आणि एकूण वजन (३०० किलो) या विभागांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजनाचा विक्रम रचला. क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये वजन उचलताना त्याला दोन वेळा त्रास झाला; पण त्यातून सावरत त्याने सोनेरी यश मिळवले. जेरेमीने स्नॅचमध्ये १४० किलो वजन उचलत सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी एडिडिओंगविरुद्ध आघाडी घेतली. यानंतर अखेरच्या प्रयत्नात त्याने १४३ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. २०२१च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या जेरेमीने क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १५४ किलो वजनासह सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने १६० किलो वजन उचलले. मग १६५ किलोचा त्याचा तिसरा प्रयत्न सदोष होता.

मीराबाई चानू (सुवर्ण), संकेत सरगर (रौप्यपदक), बिंद्याराणी देवी (रौप्यपदक) आणि गुरुराजा पुजारी (कांस्यपदक) यानंतर भारताचे वेटलिफ्टिंगमधील हे पाचवे पदक आहे.

अखेरच्या प्रयत्नात वजन उचलण्यात अपयश आल्यामुळे मला अश्रू अनावर झाले. मी इतरांची कामगिरी पाहिली नाही. अखेर मी प्रशिक्षकांना विचारले, तेव्हा त्यांनी मला सुवर्णपदक जिंकल्याचे सांगितले. माझ्या प्रशिक्षकांनी वजनाची विभागणी चांगल्या पद्धतीने केली होती. त्यामुळे मला पदकापासून वंचित राहावे लागले नाही. युवा ऑलिम्पिकनंतर वरिष्ठ स्तरावरील माझी ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे. यात सुवर्ण कामगिरी केल्याचा आनंद आहे.

– जेरेमी लालरिननुंगा

जेरेमीची यशस्वी कामगिरी

जेरेमीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी २०१६च्या जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेतील ५६ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले होते. २०१७ मध्येही त्याने रौप्य कामगिरी केली. २०१८च्या कनिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकावले होते. तसेच २०१८च्या युवा ऑलिम्पिकमध्येही त्याने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली होती.