ऋषिकेश बामणे
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या दीड वर्षांत अनेक फुटबॉल स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. मात्र कठीण परिस्थितीतून फुटबॉलनेच सर्वप्रथम मार्ग काढून क्रीडा क्षेत्राला नवसंजीवनी दिली. त्यामुळे आता पुढील एक महिना जगभरातील तमाम फुटबॉल चाहत्यांसाठी मनोरंजनाच्या दुहेरी पर्वणीचा ठरणार आहे. एकीकडे युरोपियन देशांत युरो चषक पटकावण्यासाठी संघर्ष कायम असतानाच रविवार, १३ जूनपासून दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रांमध्ये कोपा अमेरिका चषकावर नाव कोरण्यासाठी रगेल वृत्तीच्या लॅटिनोंची लढाई सुरू होईल.
कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे गतवर्षी ही स्पर्धा खेळवण्यात येणार होती. मात्र करोनामुळे वर्षभर स्पर्धा लांबणीवर पडली. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दोन देश संयुक्तपणे ‘कोपा अमेरिका’चे आयोजन करणार होते. मात्र स्पर्धेच्या एका महिन्यापूर्वी असंख्य नाटय़मय घडामोडी घडल्या. त्यामुळे कोलंबिया आणि अर्जेटिना यांनी विविध कारणांस्तव स्पर्धेचे यजमानपद नाकारले. मग ब्राझिलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनारो यांनी पुढाकार घेत स्पर्धेच्या आयोजनाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ब्राझिलमधील जनतेसह खेळाडूंनीसुद्धा स्पर्धेच्या आयोजनाला विरोध दर्शवला. राष्ट्रपतींच्या विरोधात तिथे निदर्शनेही करण्यात आली. अखेर स्पर्धेच्या दोन दिवसांपूर्वी ब्राझिल सर्वोच्च न्यायालयाने स्पर्धेच्या आयोजनाला हिरवा कंदील दर्शवला आणि मग खेळाडूंनीही खेळण्यास होकार दिला. त्या पाश्र्वभूमीवर १० जुलैपर्यंत १० संघांत खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेतील दोन्ही गटांचा घेतलेला हा वेगवान आढावा झ्र्
अर्जेटिनाची गटसाखळीत खडतर परीक्षा
लिओनेल मेसीचा अर्जेटिना संघ ‘अ’ गटात सहभागी असून या गटात चिली, उरुग्वे, पॅराग्वे, बोलिव्हिया अशा आव्हानात्मक संघांचा समावेश आहे. त्यामुळे अर्जेटिनाला दमदार तयारीसह मैदानात उतरावे लागेल. २०१६मध्ये चिलीविरुद्धच्या अंतिम सामन्यात पेनल्टीवर गोल करण्याची संधी वाया घालवल्यामुळे मेसीने निवृत्तीचा निर्णय घेतला होता. परंतु चाहत्यांच्या प्रेमापोटी त्याला पुनरागमन करावे लागले. यंदा अर्जेटिनाच्या संघात मेसीव्यतिरिक्त सर्जिओ अग्युरो, अँजेल डी मारिया, लॉटरो मार्टिनेझ अशा प्रतिभावान खेळाडूंचा समावेश असल्यामुळे त्यांना १५वे जेतेपद मिळवण्याची उत्तम संधी आहे. उरुग्वेच्या लुईस सुआरेझ आणि एडिन्सन कव्हानी या जोडीपासून प्रतिस्पध्र्याना सावध राहावे लागेल. उरुग्वेनेच सर्वाधिक १५ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र २०११नंतर उरुग्वेला एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे यंदा क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धामध्ये अनुक्रमे अॅटलेटिको माद्रिद आणि मँचेस्टर युनायटेड या संघांसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या सुआरेझ-कव्हानी जोडीवर उरुग्वेची फार मदार असेल. चिलीचा अनुभवी गोलरक्षक आणि कर्णधार क्लाऊडिओ ब्राव्हो वयाच्या ३८व्या वर्षीही खेळणार आहे. त्याच्यासाठी ही स्पर्धा संस्मरणीय करण्यासाठी चिलीचे खेळाडू उत्सुक असतील. अॅलेक्सिस सँचेझ आणि अर्टुरो विदाल चिलीच्या आक्रमणाची धुरा वाहील. पॅराग्वे आणि बोलिव्हिया या संघांनी अन्य तीन संघांपैकी एकाला धक्का दिल्यास स्पर्धेतील चुरस वाढेल. एका गटातून चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र होतील.
ब्राझिलपुढे जेतेपद टिकवण्याचे दडपण
अवघ्या काही दिवसांपूर्वी ब्राझिलचा संघ यंदा कोपा अमेरिका स्पर्धेत खेळणार की नाही, याविषयी संभ्रम कायम होता. परंतु आता गतविजेत्या ब्राझिलवर जेतेपद टिकवण्याचे दडपण असेल. २०१९मध्ये ब्राझिलने पेरू संघाला ३-१ अशी धूळ चारून विजेतेपद मिळवले होते. यंदा ब्राझिल आणि पेरू एकाच गटात असल्यामुळे चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळेल. याव्यतिरिक्त कोलंबिया, इक्वाडोर आणि व्हेनेझुएला या संघांचाही ‘ब’ गटात समावेश आहे. नेयमार चाहत्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून त्याच्याव्यतिरिक्त गॅब्रिएल जिजस, रॉबटरे फर्मिनो आणि व्हिनिशियस ज्युनिअर या त्रिकुटावरही ब्राझिलचे भवितव्य अवलंबून असेल.
कोलंबियाचा संघ सध्या देशातील आव्हानांचे दडपण मागे सारून या स्पर्धेत खेळणार आहे. त्यांच्याकडून फारशी कोणाला अपेक्षा नसली, तरी २०१९मध्ये त्यांनी बलाढय़ अर्जेटिनाला पराभूत केले होते. त्यामुळे कोलंबियाला कमी लेखणेही महागात पडू शकते. इक्वाडोर आणि व्हेनेझुएला यांपैकी एकच संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. गतविजेत्या ब्राझिलला गटात अग्रस्थान मिळवण्याची नामी संधी असून त्यांना अशी कामगिरी करण्यात अपयश आल्यास स्पर्धेत अधिक रंगत निर्माण होईल.
rushikesh.bamne@expressindia.com