Coronavirus in IPL 2020 : भारताचा मधल्या फळीतील संयमी फलंदाज करूण नायर याने कोविड-१९ वर यशस्वीरित्या मात केली असून आता तो हळूहळू तंदुरूस्त होत आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, करूण नायरची करोना चाचणी आधी सकारात्मक आली होती, पण त्याच्या ८ ऑगस्टच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. IPLमध्ये सहभाग घेण्यासाठी पुढील आठवड्यात सर्व संघ युएईला रवाना होणार आहेत. यापैकी किंग्ज इलेव्हन पंजाब संघासह करूणदेखील युएईला जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

करूण नायर हा दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी गृह विलगीकरणात होता. त्यानंतर झालेल्या चाचणीमध्ये त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. आता किंग्ज इलेव्हन संघ व्यवस्थापनातर्फे युएईला तातडीने प्रवास करण्याच्या प्रोटोकॉलचा भाग म्हणून नायरच्या आणखी एकूण तीन वेळा करोना चाचण्या होतील. करोना चाचणी निगेटिव्ह येणारे खेळाडू आणि सहकारी वर्गातील सदस्यच २० ऑगस्टनंतर युएईला उड्डाण करू शकतील. करूण नायर बेंगळुरूहून चार्टर विमानात चढणार आहे. तेथे एका छोटा गट या चार्टर विमानाने प्रवास करत दिल्लीतील खेळाडू आणि कर्मचारी यांना विमानाने मुंबईला घेऊन येईल.

करूण नायरने २०१८ आणि २०१९ या दोन IPL हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व केले आहे. या हंगामांमध्ये मिळून त्याने एकूण १४ सामने खेळले आहेत. त्यात १३४.८० च्या स्ट्राईक रेटने दोन अर्धशतकांसह त्याने ३०६ धावा केल्या आहेत.