कॅरेबियन प्रिमियर लीग स्पर्धेच्या २१ व्या सामन्यात सेंट लुसिया झोक्स संघाने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्स संघाला धूळ चारली. हार्डस विल्जोएनने चार षटकांत टिपलेल्या तीन बळींच्या जोरावर झोक्स संघाने सामना खिशात घातला. प्रथम फलंदाजी करत झोक्स संघाने २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पॅट्रिओट्स संघाला मात्र केवळ ९ बाद १४५ धावांपर्यंतच मजल मारता आली.

या सामन्यात पॅट्रिओट्स संघाविरूद्ध गोलंदाजी करताना झोक्स संघाच्या गोलंदाजाने एक भन्नाट झेल टिपला. १५ षटकांचा खेळ झाला होता. सोळाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फवाद अहमदने मोहम्मद हाफीजला गोलंदाजी केली. त्याने पुढे येऊन चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला चेंडू चांगल्या प्रकारे फटकावता आला नाही. त्यावेळी फवाद अहमदने उडी मारून चेंडू झेलण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या हाताला लागून उडाला. चेंडू हातून सुटतो की काय असे वाटत असतानाच त्याने दुसऱ्या हाताने पटकन चेंडू झेलला आणि भन्नाट झेल टिपला.

दरम्यान, आंद्रे फ्लेचरने केलेल्या सर्वाधिक ३६ धावा आणि ख्रिस बार्नवेलच्या झंझावाती २७ धावांच्या खेळीच्या बळावर सेंट लुसिया झोक्स संघाने १६५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लॉरी इव्हॅन्स (२८) आणि मोदम्मद हाफीज (२९) यांच्या भागीदारीमुळे सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्स संघाला विजयाची आशा होती, पण हे दोघे मोक्याच्या वेळी माघारी परतले आणि त्याचा फायदा सेंट लुसिया झोक्स संघाला झाला. सेंट लुसिया झोक्स संघाने सामना २० धावांनी जिंकला.