पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू रिअल माद्रिदला सोडचिठ्ठी देणार, अशा चर्चाना ऊत आला होता. पण रिअल माद्रिद संघाकडून रोनाल्डोच्या करारात वाढ करण्यात आल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कराराचे नूतनीकरण करण्यात आल्यामुळे आता रोनाल्डो पुढील पाच वर्षे रिअल माद्रिदकडूनच खेळताना दिसणार आहे. रिअल माद्रिद क्लबच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘‘रोनाल्डोबरोबर केलेल्या कराराची मुदत २०१५मध्ये संपत होती. ही मुदत आता २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे.’’ या कराराद्वारे रोनाल्डोला वर्षांकाठी किती मानधन मिळणार, हे मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र रोनाल्डोला प्रत्येक मोसमाकरिता १७ दशलक्ष युरो मिळतील, अशी चर्चा आहे. त्याचा प्रतिस्पर्धी आणि बार्सिलोनाचा अव्वल खेळाडू लिओनेल मेस्सीपेक्षा एक दशलक्ष युरोने जास्त मानधन त्याला मिळणार आहे. या कमाईमुळे रोनाल्डो हा स्पॅनिश फुटबॉलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिअल संघाने वेल्सच्या गॅरेथ बेल याला ९४ दशलक्ष युरोच्या मानधनावर करारबद्ध केले. त्यामुळे रोनाल्डोच्या कराराविषयी सर्वानाच उत्सुकता होती.