इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये २२व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यामध्ये १८ पदके आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक दहा पदके वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानदेखील भारताचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचा वेटलिफ्टिंगपटू नूह दस्तगीर बट्टने २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानसाठी पहिले पदक जिंकले आहे. विशेष म्हणजे पदक जिंकल्यानंतर या पाकिस्तानी खेळाडूने भारतीय खेळाडूचे आभार मानले आहेत.

बटने पुरुषांच्या १०९ किलोपेक्षा जास्त वजनी गटात ४०५ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. पाकिस्तानच्या २४ वर्षीय खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्नॅचमध्ये १७२ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये २३२ किलो असे एकूण ४०५ किलो वजन उचलून विक्रम केला आपल्या या कामगिरीसाठी दिग्गज भारतीय महिला वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूकडून प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे. पदक जिंकल्यानंतर त्याने पीटीआयला सांगितले, “मीराबाई चानू माझे अभिनंदन केले. तिने माझ्या कामगिरीचे कौतुक केले, तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता.”

हेही वाचा – CWG 2022: भारतीय पुरुष संघाची सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत धडक; हरमनप्रीत सिंगची भन्नाट कामगिरी

बट पुढे म्हणाला, “आम्ही मीराबाईकडे प्रेरणास्रोत म्हणून पाहतो. दक्षिण आशियाई देशांतील खेळाडूही ऑलिंपिक पदकं जिंकू शकतात, हे तिने दाखवून दिले आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये तिने रौप्यपदक जिंकले तेव्हा आम्हा सर्वांना तिचा अभिमान वाटला.”

मीराबाई चानूव्यतिरिक्त नूह बट गुरदीप सिंगलाही आपला जवळचा मित्र मानतो. गुरदीप विषयी बोलताना बट म्हणाला, “गेल्या सात-आठ वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही परदेशात अनेकदा एकत्र प्रशिक्षण घेतो. आम्ही नेहमी संपर्कात असतो.”

हेही वाचा – विश्लेषण : ४९ किलो वजन असलेल्या मीराबाई चानूने ११३ किलो वजन कसे उचलले असेल? जाणून घ्या सविस्तर माहिती

बट आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी दोनदा भारतात आला आहे. पुन्हा एकदा भारतात येण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. “मी दोनदा भारतात आलो आहे. मला मिळालेला पाठिंबा मी कधीही विसरणार नाही. मला पुन्हा भारतात यायचे आहे,” असे तो म्हणाला.