नुकत्याच पार पडलेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये ६१ भारतीय खेळाडूंनी पदके जिंकली. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर अनेक खेळाडूंच्या संघर्षाच्या गोष्टी समोर आल्या. या सर्व खेळाडूंमध्ये एक खेळाडू अशी होती जिने सातासमुद्रापार लंडनमध्ये जगाला भारतीय संस्कृतीची झलक दाखवली. चालण्याच्या शर्यतीमध्ये (रेस वॉक) रौप्य पदक पटकावणाऱ्या प्रियंका गोस्वामीने पदक वितरण सोहळ्यात आपल्यासोबत 'बाळकृष्णा'ची मूर्ती घेऊन प्रवेश केला होता. पदक वितरण सोहळ्यातील तिचे बाळकृष्णा'च्या मूर्तीसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. प्रियांकाने चालण्याच्या शर्यतीत १० हजार मीटर अंतर ४९ मिनिटे ३८ सेकंदात पार करून दुसरे स्थान पटकावले. त्यामुळे तिला रौप्य पदक मिळाले. प्रियंका गोस्वामीने पदक वितरण सोहळ्यात आपल्यासोबत 'बाळकृष्णा'ची मूर्ती घेऊन प्रवेश केला होता. विशेष म्हणजे तीने मूर्तीला भारतीय राष्ट्रध्वजातील तीन रंगाची वस्त्रे घातली होती. आपल्याला मिळालेले पदक तिने भगवान श्रीकृष्ण आणि कुटुंबाला समर्पित केले. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे यश मिळू शकले नसते, अशी प्रतिक्रिया तिने दिली होती. ''लॉकडाऊनच्या काळात माझ्या आईने मला बाळकृष्णावर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या आशिर्वादाशिवाय माझ्या मेहनतीचे चीझ झाले नसते. शिवाय, स्वीकारताना मी बाळकृष्णाला सोबत आणले जेणेकरून संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीची झलक दिसेल", अशी प्रतिक्रिया प्रियंकाने माध्यमांना दिली होती. मूळची मेरठची असलेली प्रियांका गोस्वामी रेल्वेत नोकरी करते. तिने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. २०२१ च्या टोकियो ऑलिंपिकमध्येही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.