सायकल हा सर्वसामान्यांच्या आयुष्याचा घटक. मात्र शालेय टप्प्यानंतर सायकलचे महत्त्व ओसरू लागते. अन्य खेळांप्रमाणेच नियमांची चौकट असलेला खेळ म्हणजे सायकलिंग. मात्र एक खेळ म्हणून भारतात सायकलिंग या खेळाला मोठी भरारी घेता आली नाही. भारतीय चाहते फक्त टीव्हीच्या माध्यमातून ‘टूर डी फ्रान्स’सारख्या सायकल शर्यतीचा आस्वाद घेताना दिसतात. प्रत्यक्षात मात्र हाताच्या बोटावर मोजता येण्याइतपत सायकलपटू आपल्या देशात आहेत. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिल्लीत भारतीय क्रीडा प्राधिकरणाऱ्या (साइ) राष्ट्रीय सायकलिंग अकादमीचे उद्घाटन केले. या अकादमीच्या माध्यमातून सायकलिंगपटूंना सखोल मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे. दुसरीकडे लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाच्या भारतात मोजकेच वेलोड्रोम (सायकलिंगसाठीचे ट्रॅक) उपलब्ध आहेत. उपलब्ध असलेल्या वेलोड्रोमची स्थिती भकास आहे. या खेळाकडे वळू पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे, मात्र या सायकलिंगपटूंना मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यांच्यासाठी असणारे नोकरीचे पर्याय मर्यादित आहेत. त्यामुळे या खेळाच्या विकासासाठी खेळाडू, संघटना आणि सरकार यांनी सर्वागीण विचार केला तरच सायकलिंग खेळ म्हणून बहरेल, असा सूर चर्चेच्या मैदानातून व्यासपीठावर सायकलिंग क्षेत्राशी निगडीत मान्यवरांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्य खेळांच्या तुलनेत सायकलिंग खेळाचे स्वरुप वेगळे आहे. स्पर्धात्मक सायकलिंगसाठी लागणाऱ्या सायकलची किंमत काही लाखांपर्यंत जाते. त्याच्या जोडीला चांगल्या दर्जाचे हेल्मेट परिधान करणे अनिवार्य असते. याच्या जोडीला सायकलचे सुटे भाग बाळगणे आवश्यक ठरते. वायुव्हिजन होईल आणि स्पर्धकाला निरोगी ठेवणारे टी-शर्ट्स आणि बूट गरजेचे असतात. याव्यतिरिक्त सायकलपटूंना सकस आहार, नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. एकूणच सायकलिंग खर्चिक खेळ आहे. हा खर्च परवडणारे खेळाडूच या खेळाकडे वळतात. दैनंदिन कामकाजात सायकल चालवता येणे आणि स्पर्धात्मक सायकलिंग यात  प्रचंड फरक आहे. सायकलिंग शर्यतीसाठी व्हेलोड्रोम संरचना आवश्यक असते. आपल्या देशात केवळ अकरा ठिकाणी ही सुविधा आहे. मुंबईत व्हलोड्रोम नाहीच, पुण्यात बालेवाडीत व्यवस्था आहे. परंतु या ठिकाणी गवत उगवलेले आहे. तिथे सापही आढळतात. त्यामुळे स्पर्धक सराव करू शकत नाहीत. सायकलिंग स्पर्धाना स्पर्धकांचा आणि प्रायोजकांचा समाधानकारक पाठिंबा असतो. मात्र सायकलपटूंना ठोस रकमेची हमी देणाऱ्या नोकऱ्यांची उपलब्धता नसल्याने अडचणी वाढतात. मुंबईत हा खेळ रुजवण्यात, लोकप्रिय करण्यात पारसी समाजाचा मोठा वाटा आहे. परंतु आता तेही प्रमाण घटताना दिसत आहे.
गजेन गानला , वरिष्ठ उपाध्यक्ष, भारतीय सायकिलग महासंघ

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cycling development
First published on: 08-03-2014 at 06:05 IST