माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू डॅनियल व्हेटोरी याचा भारताविरुद्ध होणाऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी विचार केला जाणार नाही, असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी येथे सांगितले.
या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची निवड बुधवारी जाहीर केली जाणार आहे. न्यूझीलंडचा सर्वात प्रौढ खेळाडू व्हेटोरी याला पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त केले आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान दिले जाणार नाही, असे हेसन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, याबाबत व्हेटोरीने माझ्याशी सविस्तर चर्चाही केली आहे. पाठीच्या दुखण्याचा त्याला त्रास होत असला, तरी तो सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बाश स्पर्धेत खेळत आहे. त्याला अधून मधून वैद्यकीय उपचारही करून घ्यावे लागत आहेत. भारताविरुद्ध खेळण्याची त्याची इच्छा असली, तरी तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच त्याचा संघात स्थान देण्याविषयी विचार केला जाईल.
व्हेटोरी याने १८ व्या वर्षी कसोटीत पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने तीनशे विकेट्स व तीन हजार धावा अशी कामगिरी करणाऱ्या आठ खेळाडूंमध्ये त्याला स्थान आहे. त्याने ११२ कसोटीत ३६० बळी व ४५१६ धावा केल्या आहेत. एक दिवसीय २७५ सामन्यांमध्ये त्याने २८४ बळी व २११० धावा अशी कामगिरी केली आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली असल्यामुळे त्याच्या खेळाडू म्हणून कारकीर्दीबाबत साशंकता निर्माण झाली आहे.