अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ख्रिस गेल, डॅरेन सॅमी यांनीही या प्रकरणावर आपलं परखड मत मांडलं. फक्त फुटबॉलमध्येच नाही तर क्रिकेटमध्येही खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो, असं विधान ख्रिस गेलने केलं होतं. तर ICC ने या विरोधात भूमिका घेण्याचं आवाहन डॅरेन सॅमीने केलं होतं. सॅमी आणि ख्रिस गेल यांनी आपल्याला खेळत असताना अनेकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचंही जाहीर केलं होतं. त्यानंतर डॅरेन सॅमीने, IPL मध्ये मला संघातील काही खेळाडू काळू म्हणायचे, असं सांगितलं होतं. त्यावर एका चाहत्याने त्याची समजूत काढण्याची प्रयत्न केली, पण सॅमीनेच त्याला रोखठोख उत्तर देत गप्प केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“डॅरेन सॅमी, तुला माहिती असावं म्हणून सांगतो, काळू हा शब्द नेहमी वर्णद्वेष व्यक्त करण्यासाठी वापरला जात नाही. भारतीय कुटुंबांमध्ये काही वेळा प्रेमाने किंवा टोपणनावाप्रमाणे अशी हाक मारली जाते. माझी आजी मला याच नावाने हाक मारायची. त्यामुळे तो शब्द कशाच्या संदर्भात उच्चारला गेला आहे, त्यावर त्यामागची भावना समजते. कधी कधी हा शब्द वर्णद्वेषासंदर्भात वापरतात, पण प्रत्येक वेळी तोच अर्थ असेल असं नाही”, असं एका चाहत्याने सॅमीला ट्विट करून समजावलं. त्यावर सॅमीने अगदी मोजक्या शब्दात त्या चाहत्याला उत्तर दिलं. “जर काळू या शब्दाला वर्णद्वेषाची किनार असेल, तर तो शब्द कोणीच वापरू नये”, असे उत्तर देत त्याने चाहत्याला गप्प केलं.

काय म्हणाला डॅरेन सॅमी?

“मी IPL मध्ये हैदराबाद संघाकडून खेळत असताना मला काळू या नावाने हाक मारायचे. मला आता त्या शब्दाचा अर्थ कळतो आहे. मी आणि थिसारा परेरा दोघांनीही संघात काळू या नावाने संबोधलं जायचं. मला आधी वाटलं होतं की हा कुठला तरी चांगला शब्द असेल. पण त्याचा संदर्भ लागल्यावर आणि समजल्यावर मला आणखीनच दुःख झालं”, असं सॅमीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले. या आधीही सॅमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर फ्लॉयड यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत, क्रिकेटमध्ये आपल्यासारख्या खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना कसा करावा लागतो याबद्दल माहिती दिली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Darren sammy gives befitting reply to twitter user fan who tells him kalu is not always a racist slur racism in ipl vjb
First published on: 11-06-2020 at 11:46 IST