पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात नाबाद त्रिशतकी खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ब्रायन लाराचा सर्वोच्च ४०० धावांचा विक्रम रोहित शर्मा मोडू शकेल असं वक्तव्य डेव्हिड वॉर्नरने केलं आहे.

वॉर्नर ३३५ धावांवर खेळत असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने आपल्या संघाचा डाव ५८९ धावांवर घोषित केला. वॉर्नर ब्रायन लाराचा विक्रम मोडण्यासाठी अवघ्या ६५ धावा दूर असताना ऑस्ट्रेलियन कर्णधाराने डाव घोषित केल्यामुळे त्याच्यावर टीकाही करण्यात आली. मात्र Fox Sports वाहिनीशी बोलत असताना वॉर्नरने आपली बाजू स्पष्ट केली.

“मला वाटतं हा निर्णय प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. ऑस्ट्रेलियन मैदानांच्या सीमारेषा या खूप दूर आहेत. त्यामुळे एका क्षणानंतर तुम्हाला थकवा येतो, आणि तुम्हाला मोठे फटके खेळता येत नाहीत. त्यामुळे काही क्षणानंतर मी एक-दोन धावा काढण्याकडे भर दिला. मात्र एक दिवस रोहित शर्मा ब्रायन लाराचा विक्रम मोडू शकतो.” दरम्यान ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱ्याने पाकिस्तानचा पहिला डाव ३०२ धावांवर संपवला.