कोरियाविरुद्ध ३-० अशी विजयी आघाडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत नाइलाजाने एकत्र खेळणार असलेल्या लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा द्वयीच्या विजयासह प्रतिष्ठेच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आशिया/ओश्ॉनिया गटात भारताने कोरियाविरुद्ध ३-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयासह भारताने डेव्हिस चषकात तुल्यबळ जागतिक गटाच्या प्ले ऑफमध्ये स्थान पटकावले. सप्टेंबर महिन्यात जागतिक गट प्ले-ऑफची लढत होणार असून, यामध्ये भारतासमोर चीन किंवा उझबेकिस्तानचे आव्हान असणार आहे.

पेस-बोपण्णा जोडीने कोरियाच्या सेआँग चान होंग आणि होंग च्युंग जोडीवर सरळ सेट्समध्ये ६-३, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. चंदिगढ क्लबच्या ग्रास कोर्टवर झालेल्या लढतीत आद्र्र वातावरणात एक तास आणि ४१ मिनिटे चाललेल्या लढतीत पेस-बोपण्णा जोडीने बाजी मारली. शुक्रवारी झालेल्या एकेरीच्या लढतींमध्ये साकेत मायनेनी आणि रामकुमार रामनाथन यांनी विजय मिळवत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. रविवारी होणाऱ्या परतीच्या एकेरीच्या लढतींमध्ये साकेत मायनेनी आणि सेआँग चान होंग तर रामकुमार रामनाथन आणि योंग क्यु लिम समोरासमोर असणार आहेत.

जागतिक क्रमवारीत अव्वल दहांमध्ये असल्याने रोहन बोपण्णाला ऑलिम्पिकसाठी सहकारी निवडण्याची मुभा होती. यानुसार त्याने साकेत मायनेनीच्या नावाला पसंती दिली होती. मात्र अखिल भारतीय टेनिस संघटनेने बोपण्णासह पेसची निवड केली. ऑलिम्पिकपूर्वी हे दोघे एकत्रित खेळण्याची ही एकमेव स्पर्धा आहे. या जोडीने लौकिकाला साजेसा खेळ केला नाही. मात्र तरीही कोरियाच्या जोडीला नमवण्यात ते यशस्वी ठरले.

१९९० साली चंदिगढ क्लबच्याच कोर्टवर पेसने डेव्हिस चषक पदार्पण केले होते. चाळिशीनंतरही तंदुरुस्त जपणाऱ्या पेसने हजारांहून अधिक चाहत्यांना बोपण्णाच्या साथीने विजयाची अनोखी भेट दिली. डेव्हिस चषकाच्या निमित्ताने पेस-बोपण्णा पाचव्यांदा एकत्रित खेळत होते. याआधी सर्बिया (२०१४) तर कझाकस्तान (२००७) विरुद्ध त्यांनी विजय मिळवला होता. मात्र उझबेकिस्तान (२०१२), चेक प्रजासत्ताक (२०१५) विरुद्ध ही जोडी पराभूत झाली होती. गेल्या वर्षी दिल्लीत चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या सामन्यात या जोडीने सुमार दर्जाचा खेळ केला होता.

कोरियाविरुद्धच्या लढतीत वेगवान सव्‍‌र्हिस हे बोपण्णाच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. तब्बल नऊ बिनतोड सव्‍‌र्हिस करत बोपण्णाने विजयाचे पारडे भारताच्या दिशेने फिरवले. वाढत्या वयासह हालचाली किंचित मंदावलेल्या पेसने ड्रॉपच्या अफलातून फटक्यांसह युवा कोरियन जोडीला निष्प्रभ केले. नेटजवळून शिताफीने फटके लगावणाऱ्या पेसने ऑलिम्पिकसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.

 

पेसबरोबर खेळताना मजा आली. आमच्यातील समन्वय उत्तम असल्यामुळेच विजय मिळवू शकलो.

– रोहन बोपण्णा

 

आम्ही सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. चांगल्या खेळाचे हे प्रतीक आहे. उजव्या आणि डावखुऱ्या जोडीविरुद्ध खेळणे कठीण असते. परंतु संपूर्ण सामन्यात सातत्य राखत आम्ही विजय साकारला. कोरियाच्या जोडीला कमी लेखण्याची चूक आम्ही केली नाही.

– लिएण्डर पेस

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Davis cup leander paes rohan bopannas win 3
First published on: 17-07-2016 at 03:14 IST