भारताची आघाडीची जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकरला गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पध्रेत दुखापतीमुळे सहभाग घेता येणार नसला तरी आगामी आशियाई क्रीडा स्पध्रेत पदक जिंकण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे.

रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत दीपाचे कांस्यपदक काही गुणांनी हुकले होते. ऑलिम्पिक स्पध्रेत सहभागी झालेली ती पहिली भारतीय जिम्नॅस्टिक्सपटू ठरली. त्यानंतर तिच्याकडून अपेक्षा उंचावल्या, परंतु दुखापतीमुळे तिला ४ ते १५ एप्रिल या कालावधीत गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या स्पध्रेतून माघार घ्यावी लागली.

‘‘राष्ट्रकुल स्पध्रेत सहभागी होता येणार नसल्याने मी निराश आहे. २०१४च्या राष्ट्रकुल स्पध्रेत मी कांस्यपदक जिंकले होते. दुखापत झाली नसती तर निश्चितच गोल्ड कोस्ट येथे सहभाग घेतला असता. खेळाडूंना आयुष्यात दुखापतीला सामोरे जावे लागते आणि त्याचा सामना करावाच लागलो. दुखापतीतून सावरत आहे आणि आता आशियाई स्पध्रेसाठीच्या तयारीला सुरुवात करणार आहे. राष्ट्रकुल स्पध्रेत भारतीय जिम्नॅस्टिक्स संघाची कामगिरी यंदा चांगली होईल,’’ असा विश्वास तिने व्यक्त केला.

प्रोडय़ुनोव्हा प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या दीपाने आशियाई स्पध्रेत व्होल्ट प्रकारात अधिक भर देणार असल्याचे सांगितले. परंतु व्होल्ट, अनइव्हन बार, बॅलेन्स बीम आणि फ्लोअर या चारही प्रकारांत लक्ष केंद्रित करणार असल्याचे तिने सांगितले.

‘‘प्रोडय़ुनोव्हा या प्रकारात मी जे काही शिकले ते आयुष्यभर सोबत राहील, परंतु अन्य प्रकारही शिकण्याचा मी प्रयत्न करणार आहे.  लोकांकडून मिळत असलेल्या पाठिंब्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पध्रेत नक्की पदक जिंकेन. आता पुन्हा चौथ्या स्थानावर समाधान मानायचे नाही. त्यामुळे आशियाई स्पध्रेवर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.’’

जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पध्रेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणाऱ्या अरुणा रेड्डीचे दीपाने कौतुक केले. ती म्हणाली, ‘‘२०११पासून अरुणा राष्ट्रीय शिबिरात विश्वेश्वर नंदी सरांकडून प्रशिक्षण घेत आहे आणि २०१४ ते २०१७ आम्ही एकत्र सराव केला असून एकाच खोलीत राहात होतो. ती माझी जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे तिच्या या ऐतिहासिक पदकाचा मला सार्थ अभिमान आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.’’

ग्लासगो राष्ट्रकुल स्पध्रेत दीपाने कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला होता. राष्ट्रकुल स्पध्रेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्टिक्सपटू ठरली होती. तसेच तिने २०१५च्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेतही कांस्यपदक जिंकले आहे. दीपाच्या अनुपस्थितीत अरुणा रेड्डीकडून पदकाची आशा उंचावल्या आहेत. जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पध्रेतील तिची कामगिरी कौतुकास्पद झालेली आहे.