मुंबई मॅजिशियन्स आणि दिल्ली वेव्हरायडर्स यांच्यात महिंद्रा स्टेडियमवर सोमवारी झालेल्या हॉकी इंडिया लीगमधील सामन्यात गोल्सचा वर्षांव पाहायला मिळाला. दिल्लीने ‘दे दणादण’ गोल करत मुंबईवर पूर्णपणे हुकूमत गाजवली. चाहत्यांना तब्बल १० गोलांची मेजवानी अनुभवता आली. दिल्लीने मुंबईवर ६-४ अशी मात करत गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. मुंबईला घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या तर स्पर्धेतील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
मुंबईने सुरुवातीपासूनच जोरदार चाली रचण्यास सुरुवात केली. अनेक वेळा दिल्ली वेव्हरायडर्सची बचावफळी भेदत मुंबई मॅजिशियन्सने आक्रमक खेळ केला. त्याचा फायदा मुंबईला सहाव्या मिनिटालाच मिळाला. सामन्यातील पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर संदीप सिंगने मुंबईचे खाते खोलले. पण काही मिनिटानंतर लगेचच दिल्लीने ऑस्कर डिकेच्या गोलमुळे बरोबरी साधली. दिल्लीच्या आक्रमक चढायांना त्यांच्या खेळाडूंची चांगली साथ लाभली. मुंबईची व्यूहरचना भेदण्याचे काम दिल्लीने केले. २२व्या मिनिटाला नोरिस जोन्स आणि २६व्या मिनिटाला दानिश मुज्तबा याने गोल करून दिल्लीला मध्यंतरापर्यंत ३-१ अशा आघाडीवर आणून ठेवले.
मुंबईने संघात अनेक बदल करत मध्यंतरानंतर सुरेख पुनरागमन केले. या सत्रात मुंबईच्या वाटय़ाला तीन पेनल्टीकॉर्नर मिळाले. त्यावर ग्लेन टर्नर, जेसन विल्सन आणि संदीप यांनी गोल करत सामन्यातील रंगत वाढवली. निरसवाण्या सामन्यात मुंबईने लागोपाठ तीन गोल करून ४-३ अशी आघाडी घेतल्याने चाहत्यांमध्येही उत्साह संचारला. पण पाच मिनिटांत तीन गोल करून दिल्लीने सामन्यावरील पकड मजबूत केली आणि सामना आपल्या बाजुने झुकविला. गुरविंदर सिंग चंडीने मुंबईच्या गोलक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्याने दिलेल्या पासवर आकाशदीप सिंगने हवेत झेप घेऊन ५३व्या मिनिटाला चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली.
५५व्या मिनिटाला आन्द्रेस मिर बेल आणि ५६व्या मिनिटाला सायमन चाइल्ड यांनी गोल झळकावून दिल्लीला ६-४ अशा आघाडीवर आणून ठेवले. सामन्यात बरोबरी साधण्याचे मुंबईचे प्रयत्न अखेर व्यर्थ ठरले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
दिल्लीचे ‘दे दणादण!’
मुंबई मॅजिशियन्स आणि दिल्ली वेव्हरायडर्स यांच्यात महिंद्रा स्टेडियमवर सोमवारी झालेल्या हॉकी इंडिया लीगमधील सामन्यात गोल्सचा वर्षांव पाहायला मिळाला. दिल्लीने ‘दे दणादण’ गोल करत मुंबईवर पूर्णपणे हुकूमत गाजवली.
First published on: 22-01-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi is in active with full energy