लक्ष्यची दुसऱ्या फेरीत मुसंडी

सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय या भारतीय बॅडमिंटनपटूंचे आव्हान बुधवारी डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. पारुपल्ली कश्यपने दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडला. परंतु युवा लक्ष्य सेनने दिमाखदार विजयासह दुसरी फेरी गाठली.

दुखापतीमुळे उबेर चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातून माघार घेणाऱ्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालचा जागतिक क्रमवारीत २०व्या क्रमांकावरील जपानच्या अया ओहोरीपुढे निभाव लागला नाही. आहोरीने सायनावर २१-१६, २१-१४ असा विजय मिळवला.

गेल्या रविवारी डच खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या लक्ष्यने राष्ट्रीय विजेत्या सौरभ वर्माचे आव्हान २१-९, २१-७ असे २६ मिनिटांत सहज मोडीत काढले. २० वर्षीय लक्ष्यची पुढील फेरीत ऑलिम्पिक विजेत्या व्हिक्टर एक्सेलसेनशी (डेन्मार्क) गाठ पडणार आहे.

प्रणॉयने इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्टीकडून १८-२१, १९-२१ अशी हार पत्करली. त्यानंतर चायनीज तैपेईच्या शोऊ टीन शेनविरुद्धच्या लढतीत कश्यपने सामना अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तो ०-३ असा पिछाडीवर होता.

मिश्र दुहेरीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा जोडीचे आव्हान संपुष्टात आले. चीनच्या फेंग यान झे आणि ड्यू युई जोडीने सात्त्विक-अश्विनी जोडीचा २१-१७, १४-२१, २१-११ असा पराभव केला. महिला दुहेरीत दक्षिण कोरियाच्या ली सोही आणि शिन सेऊंगशान जोडीने अश्विनी आणि एन. सिक्की रेड्डी जोडीला २१-१७, २१-१३ असे पराभूत केले.