खेळपट्टी जरी गोलंदाजीला पोषक होती तरी आमच्या फलंदाजांनी बेजबाबदारपणे खेळ केला आणि त्यामुळेच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.
गहुंजे येथे मंगळवारी भारताला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना धोनी म्हणाला की, ‘‘खेळपट्टीवर चेंडू अनपेक्षितरीत्या उसळत होते. तसेच त्यांच्या गोलंदाजांनी आमच्या फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. या खेळपट्टीवर फटकेबाजी करण्यास फारसा वाव नव्हता. आम्ही १२५ पेक्षा जास्त धावा केल्या असत्या तर आम्हाला विजय मिळविता आला असता.’’
श्रीलंकेच्या युवा खेळाडूंविषयी फाजील आत्मविश्वास नडला का, असे विचारले असता धोनी याने सांगितले की, ‘‘आम्ही त्यांना कमकुवत मानले नव्हते. आमच्या फलंदाजांकडून अक्षम्य चुका झाल्या. चेंडू उसळून वर येत होता. त्यावर संयमाने फटकेबाजी करायला पाहिजे होती. मालिकेत आणखी दोन सामने बाकी आहेत. त्यामध्ये या चुका टाळल्या जातील अशी मला खात्री आहे. संघातील नवोदित खेळाडूंना पहिल्या सामन्यातून खूप काही शिकावयास मिळाले आहे.’’

विजयाचे श्रेय गोलंदाजांना – दिनेश चंडिमल
‘‘भारतीय संघ बलाढय़ आहे व त्यांना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळणार आहे हे आम्हाला माहीत होते. त्यामुळेच गवत असलेल्या खेळपट्टीवर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा मी निर्णय घेतला. सुदैवाने माझ्या गोलंदाजांनी या निर्णयास साजेशी कामगिरी केली व क्षेत्ररक्षकांनी त्यांना चांगली साथ दिली. विजयाचे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल,’’ असे श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमल म्हणाला.