भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीच्या इंडिया सिमेंट्स या कंपनीच्या उपाध्यक्षपदी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची नियुक्ती करण्यात आली आहे. मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेकरिता सज्ज होण्यासाठी विश्रांती घेण्याची धोनीची इच्छा होती. पण अलीकडेच एअर इंडियाच्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर धोनी आता बीसीसीआयच्या कॉर्पोरेट चषक स्पर्धेत इंडिया सिमेंट्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. काही दिवसांपूर्वी इंडिया सिमेंट्सच्या संघात धोनीचे नाव समाविष्ट करण्यात आल्यानंतर तो या कंपनीत रुजू झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये भारताला पराभूत व्हावे लागल्यानंतर धोनीला कर्णधारपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.