रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा ही देशातील स्थानिक क्रिकेटमधील गुणवत्ता हेरणारी महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. सध्या या स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी चालू आहे. परंतु या सामन्यांमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या काही खेळाडूंना खेळता आले नाही, तर या स्पध्रेत खेळता आलेल्या काही खेळाडूंची कामगिरी कशी झाली, या प्रश्नाला उत्तर देताना भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपली या स्पध्रेच्या तारखांविषयी अनभिज्ञता प्रकट केली. ‘‘काय, कोणती स्पर्धा?’’ अशा प्रकारे त्याने सर्वप्रथम प्रसारमाध्यमांना विचारणा केली. मग आपला मुद्दा मांडताना तो म्हणाला, ‘‘दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दौरा या दोघांमधील अंतर खूप कमी होते. त्यामुळे खेळाडूंना किमान दहा दिवसांची विश्रांती हवी. याचप्रमाणे १२ जानेवारीला सकाळी आम्ही न्यूझीलंडला प्रयाण करीत आहोत. त्यामुळे काही खेळाडूंना रणजी स्पर्धेत खेळता आले नाही. तर जे खेळले त्यांची कामगिरी मला माहीत नाही.’’
आगामी न्यूझीलंड दौऱ्याविषयी धोनी म्हणाला, ‘‘न्यूझीलंडमधील मैदानांचे आकार वेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे मोठय़ा धावसंख्येचे सामने होतील. फक्त कोणत्या प्रकारच्या खेळपट्टीवर ते होणार आहेत, हे महत्त्वाचे आहे. परंतु एकंदर ही मालिका अत्यंत उत्कंठावर्धक होईल, अशी अपेक्षा आहे. मी जेव्हा पहिल्यांदा न्यूझीलंड दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा मलाही मैदान आणि क्षेत्ररक्षणाचा अंदाज आला नव्हता.’’
२०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येच विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. त्यामुळे या दौऱ्यावरील अनुभवाचा विश्वचषकाच्या दृष्टीने फायदा होईल, असे मत धोनीने व्यक्त केले.
भारताचे कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही संघांची कामगिरी समाधानकारक होत असल्याचे धोनीने सांगितले. परदेशातील मैदानांवरील भारताच्या कसोटी संघाविषयी धोनी म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेटमध्ये आठ ते अकरा क्रमांकापर्यंतच्या खेळाडूंनी फलंदाजीची जबाबदारी सांभाळणे आवश्यक असते. कारण आपण पाच गोलंदाज संघात खेळवू शकत नाही. त्यामुळे विशेषज्ञ गोलंदाजाची जबाबदारी घेऊ शकेल, अशा अष्टपैलू खेळाडूची संघाला गरज असते. रवींद्र जडेजाने ही जबाबदारी चांगली समजून घेतली आहे. परंतु आपल्याला वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या एका अष्टपैलू खेळाडूची निकड आहे.’’