जागतिक फुटबॉल नियंत्रित करणाऱ्या फिफाच्या कारभारात अनेक गैरप्रकार होत आहेत. अनुकूल निर्णयासाठी फिफाला लाच देण्याचे प्रकार घडत आहेत. अशा गैरप्रकारांत सामील असणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला हवी, असे मत अर्जेटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनी व्यक्त केला. २०२२ विश्वचषकाच्या आयोजनासाठी कतारने फिफाला लाच दिल्याच्या वृत्ताच्या पाश्र्वभूमीवर मॅराडोना बोलत होते.
‘‘फिफाच्या कारभारात मोठय़ा प्रमाणावर लाच स्वीकारली जाते. यामागे असणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होणे आवश्यक आहे. विशेषत: २०२२ कतार विश्वचषकासंदर्भातील दोषींवर कडक कारवाई व्हावी. फिफाला कोणी पैसे दिले, ते कुठे गेले आणि का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत’, असे त्यांनी पुढे सांगितले.’’
मॅराडोना पुढे म्हणले की, ‘‘लाच-गैरव्यवहार यापेक्षा धमाल खेळ म्हणून फुटबॉलचे पुनरागमन व्हावे ही इच्छा आहे. फिफातील मायकेल प्लॅटिनी यांच्यासारख्या माजी फुटबॉलपटूंनी या गैरव्यवहारासमोर नमते घेतले आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.’’