राणा प्रताप हे बुलंद शौर्याचे, पराक्रमाचे प्रतीक.. त्यांच्याच भूमीत सुरेश राणाने जिद्दीची, मानसिक-शारीरिक कणखरतेची कसोटी पाहणाऱ्या मारुती सुझुकी डेझर्ट स्टॉर्म रॅलीत एक्स्ट्रीम गटात अव्वल स्थान मिळवले. सहा दिवस वाळवंट, चित्रविचित्र चढउतार, अवघड टप्पे या सगळ्यांना पार करीत मारुती-सुझुकीतर्फे सहभागी झालेल्या राणाने डेझर्ट स्टॉर्मच्या तिसऱ्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. राणाने १२ तास, १५ मिनिटे आणि २७ सेकंदांत ही रॅली पूर्ण केली. संपूर्ण रॅलीत राणाला कडवी टक्कर देणाऱ्या सनी सिधूने दुसरे, तर लोहित अर्सने तिसरे स्थान पटकावले.
मोटो क्वॉड्स प्रकारात मोहित वर्माने अव्वल स्थानी कब्जा केला. विजय परमार दुसऱ्या, तर जर्मनीचा स्टीफन रॉशने तिसरे स्थान पटकावले. एक्स्प्लोरमध्ये महाराष्ट्राच्या संजय टकले यांनी पहिला क्रमांक मिळवला. दुसरे स्थान सतीश गोपालकृष्णन यांनी तर तिसरे स्थान राजेश चलाना यांनी पटकावले. एन्ड्युरो गटात सोमदेब चंदा अव्वल स्थान पटकावले. विजय परमार यांनी दुसरे, तर पार्थ बेनिवालने तिसरे स्थान पटकावले.
‘‘माझ्या विजयात नेव्हिगटर (साहाय्यक चालक) परमिंदर ठाकूरची भूमिका महत्त्वाची होती. सनी सिधू आणि लोहित अर्सने या दमदार प्रदर्शन करणाऱ्या रॅलीपटूंना मागे टाकीत अव्वल स्थान पटकावल्याचे समाधान आहे. सरदारशहर नजीकचा रॅलीचा रात्रीचा टप्पा सगळ्यात आव्हानात्मक होता,’’ असे राणाने सांगितले.