आम्ही कोरियामध्ये कबड्डी खेळतच होतो. पण विश्वचषकाला येण्यापूर्वी घरच्यांचा आम्हाला विरोध होता. कारण या खेळात दुखापती होऊ शकतात. त्यामुळे घरच्यांना आमच्याबाबतीत जोखीम पत्करायची नव्हती. पण भारताविरुद्धचा सामना त्यांनी पाहिला आणि त्यानंतरच घरच्यांचा विरोध मावळला आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला, असे स्पष्ट मत कोरियाचा कर्णधार डाँग जू हाँग याने व्यक्त केले.

या विश्वचषकात कोरियाने भारतासारख्या बलाढय़ संघाला सलामीच्या लढतीत पराभूत करत सर्वानाच धक्का दिला. कोरिया साखळीमध्ये अपराजित असून ते अव्वल क्रमांकावर विराजमान आहेत. विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल हाँग म्हणाला की, ‘आतापर्यंतचा विश्वचषकातला प्रवास सुखद आहे. आम्ही भारताला पराभूत करू शकतो, असा विचारही केला नव्हता. पण फक्त खेळावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आम्हाला ते शक्य झाले. आता उपांत्य फेरीत कोणताही संघ आला तरी अंतिम फेरी गाठण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.’

कोरियाने गेल्या काही सामन्यांमध्ये चांगल्या पकडी केल्या, याबद्दल विचारल्यावर हाँग म्हणाला की, ‘आम्ही प्रत्येक प्रतिस्पर्धी खेळाडूचा अभ्यास करतो. त्यांच्या खेळाचे व्हिडीओ पाहतो. त्यांची बलस्थाने आणि कच्चे दुवे टिपून ठेवतो. त्याचबरोबर संघातील खेळाडू एवढे हुशार आहेत की, ते मैदानावरच्या परिस्थितीनुसार खेळात बदल करतात. या गोष्टीचा सर्वात जास्त फायदा आम्हाला होत आहे.’

कबड्डी हा परिपूर्ण खेळ

बेसबॉल, बास्केटबॉलसारखे खेळ आम्ही  खेळतो. पण कबड्डीमध्ये चेंडू वापरला जात नाही. यामध्ये ताकद आणि चपळता दोन्ही गोष्टी लागतात. त्यामुळे कबड्डी हा परिपूर्ण खेळ वाटतो.

जँग कुन ली जायबंदी

आमचा जँग कुन ली हा प्रो-कबड्डीमध्ये नावाजलेला खेळाडू जायबंदी आहे. त्याच्या पायाला मार बसला आहे. त्यामुळे गेल्या दोन सामन्यात त्याला जास्त खेळवले नाही. तो या दुखापतीतून सावरत असून उपांत्य फेरीत तो खेळेल, अशी आम्हाला आशा आहे.

कोरियातही राष्ट्रीय स्पर्धा

कोरियामध्ये २० टक्के लोकांना कबड्डी हा खेळ माहिती आहे. कोरियामध्ये विविध विद्यापीठांमध्ये कबड्डी खेळली जाते. आमच्याकडे ६-७ विद्यापीठांचे कबड्डी संघ आहेत. या संघांची राष्ट्रीय स्पर्धाही भरवली जाते.

कोरियन प्रेक्षकांमुळे भारावलो

अहमदाबादमध्ये १० कोरियाच्या व्यक्ती आहेत. आमच्या पहिल्या सामन्याला ते जेव्हा पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये आले तेव्हा आम्ही भारावून गेलो. आमच्या प्रत्येक सामन्याला ते उपस्थित असतात आणि आमचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात.

तायक्वांदो आणि तलवारबाजीचा फायदा

कोरियामध्ये तायक्वांदो हा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. त्याचबरोबर तलवारबाजीही खेळली जाते. या दोन्ही खेळांचा आम्हाला कबड्डी शिकण्यासाठी फायदा होतो. तायक्वांदोमध्ये किक मारतात, तर तलवारबाजीमध्ये कमी जोखीम उचलून प्रतिस्पध्र्याला बाद करायचे असते, याचा फायदा आम्हाला चढाई करताना होतो.