इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पारंपरिक अ‍ॅशेस मालिकेतील पहिला सामना गाजला तो काही निर्णयांमुळे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बाद आहोत हे माहिती असूनही इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने मैदान न सोडल्यामुळे एकच गहजब झाला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या विकेटने इंग्लंडच्या नाकीनऊ आणले असताना ब्रॅड हॅडिनला बाद देण्याचा निर्णयही वादग्रस्त असल्याचे काही जणांचे मत होते. याबाबत क्रिकेट-विश्वात चर्वितचर्वण होत असताना ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक बॅड्र हॅडिनने ‘‘ ‘डीआरएस’चा (पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याची प्रणाली) निर्णय खेळाडूंच्या हाती असून नये, तर पंचांनीच या प्रणालीचा वापर करावा,’’ असे म्हटले आहे.
‘‘ मला व्यक्तिश: असे वाटते की, ‘डीआरएस’चा निर्णय पंचांच्या हाती असावा, तो खेळाडूंच्या हातामध्ये असू नये. एखादा निर्णय दिल्यावर पंच जर द्विधा मन:स्थितीत असतील तर त्यांनी  ‘डीआरएस’चा वापर करायला हवा. ब्रॉडने जे काही केले ते मला चुकीचे वाटले नाही. कारण निर्णय देण्याचा अधिकार पंचांच्या हाती होता, त्यांनी निर्णय दिला आणि त्यानुसार ब्रॉड वागला, त्यामध्ये त्याचे काही चुकले असे मला तरी वाटत नाही,’’ असे हॅडिन म्हणाला.
तो पुढे म्हणाला की,  ‘डीआरएस’ दोन्ही संघांसाठी समान होती, पण आम्हाला त्याचा इंग्लंडपेक्षा चांगला वापर करण्यात आला नाही. तंत्र वापरत असताना त्यामध्ये भावनांना स्थान द्यायचे नसते आणि हीच चूक आमच्या हातून घडली, त्यामुळेच आम्ही ज्यावेळी ‘डीआरएस’चा वापर केला तेव्हा ते आमच्या विरोधात गेले आणि जेव्हा गरज होती तेव्हा ते आम्हाला वापरता आले नाहीत.
काही सामने पाहून  ‘डीआरएस’ बंदीचा निर्णय घ्यावा – जमुला
मुंबई : सध्या ‘डीआरएस’वर बंदी घालण्यासाठी काही देश पुढे सरसावलेले पाहायला मिळतात. पण काही सामने पाहून  ‘डीआरएस’ बंदीचा निर्णय घ्यावा, असे मत माजी आंतरराष्ट्रीय पंच बोमी जमुला यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की,  ‘डीआरएस’ हे एक तंत्रज्ञान आहे, तंत्रानुसार ते काम करीत असते, एखाद्या मोटारीसारखे ते काम करते. मोटार बहुतेक वेळा चांगली चालते, पण जेव्हा मोटारीमध्ये समस्या वाढतात तेव्हा आपण मोटार चालवणे थांबवतो. त्यानुसार काही सामने ‘डीआरएस’ तंत्रज्ञान वापरून पाहावेत आणि जर जास्तीत जास्त चुकीचे निर्णय येत असतील तर त्याच्यावर विचार करायला हवा.