‘‘डंकन फ्लेचर यांच्याकडे प्रशिक्षक म्हणून बरीच क्षमता आहे. ते खेळाडूंशी मिळून-मिसळून वागतात आणि एकत्रितपणे रणनीती आखतात. परंतु त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांना मर्यादा असल्याचे निदर्शनास येते. संघ निवड करतानाही फ्लेचर यांना अधिक अधिकार देण्याची आवश्यकता आहे,’’ असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.
‘‘जेव्हा खेळाडू आपल्या समस्या घेऊन येतात, तेव्हा त्या समजून घेण्याची परिपक्वता काही प्रशिक्षकांमध्ये असते. ते कोणत्याही खेळाडूला विश्रांती देत नाहीत. त्यामुळेच संघाची निवड करताना फ्लेचर यांचे मत अधिक विचारात घ्यायला हवे,’’ असे द्रविडने सांगितले.
‘‘तुम्ही आधी व्यक्तीला योग्य अधिकार द्या, मग त्याला जबाबदार धरा. तुमच्या डंकन यांच्यासारखा अनुभवी प्रशिक्षक असेल, तर विश्वास व्यक्त करायला काहीच हरकत नाही,’’ असे तो पुढे म्हणाला.
‘‘जॉन राइट किंवा ग्रेग चॅपेल निवड समितीच्या बैठकांना सातत्याने हजेरी लावायचे, हे मला आठवते. ते स्थानिक क्रिकेट सामन्यांनाही उपस्थिती राखायचे. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये मला असे आढळून आले आहे की, संघाची निवड करताना प्रशिक्षकाला फारसे महत्त्व दिले जात नाही. गॅरी कर्स्टन यांनी भारतातील स्थानिक क्रिकेट फारसे पाहिले नाही. डंकन यांनीही ते केल्याचे दिसत नाही,’’ असे द्रविडने सांगितले.