महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) अध्यक्षपदावर काम करताना सत्कार समारंभांमध्ये अडकून न राहता राज्यातील खेळाडू व विविध खेळांच्या संघटनांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचा निर्णय एमओएचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.
एमओएचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी एका पत्रकाद्वारे हा खुलासा केला आहे. ९ जुलै रोजी ‘लोकसत्ता’ मध्ये ‘एमओए’ चे अध्यक्ष आहेत तरी कोठे? हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबाबत एमओएने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पवार यांनी एमओएचे अध्यक्ष या नात्याने क्रीडामंत्री, क्रीडा सचिव व क्रीडा संचालनालयातील अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी खेळाडू व संघटनांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. स्पर्धांचे उद्घाटन किंवा पारितोषिक वितरण समारंभांऐवजी या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे एमओएच्या अध्यक्षांनी कळविले आहे.