इंग्लंडकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत; मुमताजचे दोन गोल वाया

पोचेफस्ट्रोम : मुमताज खानच्या दोन गोलनंतरही भारतीय महिला संघाला कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेतील कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. नियमित वेळेतील २-२ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडने ३-० अशी बाजी मारली. त्यामुळे या स्पर्धेत पदक पटकावण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले.

भारतीय महिला संघाने २०१३च्या पर्वात कांस्यपदक जिंकले होते. ही भारताची कनिष्ठ विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी होती. सलिमा टेटेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदा या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी होती. मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठीच्या लढतीतील नियमित वेळेत भारतीय संघाने इंग्लंडला चांगला लढा दिला. भारताकडून मुमताजने २१ आणि ४७व्या मिनिटाला गोल केले. तर इंग्लंडचे दोन गोल मिली गिग्लिओ (१८वे मि.) आणि क्लॉडिआ स्वाइन (५८वे मि.) यांनी झळकावले.

नियमित वेळेतील २-२ अशा बरोबरीनंतर सामन्याचा विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट झाले. यात इंग्लंडकडून कर्टिस केटी, स्वाइन आणि मॅडी एक्सफोर्ड यांनी पेनल्टीचे यशस्वीरीत्या गोलमध्ये रुपांतर केले. दुसरीकडे ऑलिम्पिकपटू शर्मिला देवी, कर्णधार सलिमा आणि संगिता कुमारी या भारताच्या खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरल्या. 

त्याआधी पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र, दुसऱ्या सत्राच्या तिसऱ्या मिनिटाला गिग्लिओने गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यांची ही आघाडी केवळ तीन मिनिटेच टिकू शकली. मुमताजने २१व्या मिनिटाला गोल झळकावत भारताला १-१ अशी बरोबरी करून दिली. ही बरोबरी चौथ्या सत्रापर्यंत कायम राहिली. मात्र, मुमताजने पुन्हा ४७व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताला २-१ अशी आघाडी मिळाली. मुमताजचा हा या स्पर्धेतील एकूण आठवा गोल ठरला. पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडने अखेरच्या मिनिटांमध्ये आक्रमणाचा वेग वाढवला. अखेर ५८व्या मिनिटाला स्वाइनने गोल करत इंग्लंडला २-२ अशी बरोबरी साधून दिली.