ससेक्स आणि इंग्लंडचे माजी यष्टिरक्षक फलंदाज जिम पार्क्स यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले आहे. ते इंग्लंडचे सर्वात वयस्कर आणि हयात असलेले कसोटी क्रिकेटपटू होते. ससेक्सने जाहीर दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी वर्थिंग येथील रुग्णालयात जिम पार्क्स यांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्याच्या घरी पडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

क्रिकेटची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामध्ये पार्क्स यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील, जिम सिनिअर आणि त्याचे काका होरेस दोघेही ससेक्स क्रिकेट क्लबसाठी ४०० पेक्षा जास्त वेळा खेळले होते. सुरुवातीला डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणारे पार्क्स नंतर फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून नावारुपाला आले. पार्क्सने यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजाराहून अधिक वेळा यष्टीमागे खेळाडूंना बाद केले आहे.

पार्क्स यांनी ओल्ड ट्रॅफर्ड येथे एक विशेष फलंदाज म्हणून पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. मात्र, त्यांना फारशी खेळण्याची संधी मिळाली नाही. १९५९-६०च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर ते इंग्लंडच्या कसोटी संघात आले आणि त्याने शतकी खेळी केली. पार्क्स यांनी १९५४ ते १९६८ या कालावधी दरम्यान ४६ कसोटी सामने खेळले होते. त्यानंतरची आणखी वर्षे त्यांनी काउंटी क्रिकेट खेळले. क्रिकटमधून निवृत्त झाल्यानंतर पार्क्स यांनी ब्रुअर व्हिटब्रेडसाठी आणि ससेक्स क्रिकेट क्लबचे विपणन व्यवस्थापक म्हणून काम केले. शिवाय या दोन्ही ठिकाणी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दोन टर्म कारभार सांभाळला होता. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये दोन शतकांसह एक हजार ९६२ धावा केल्या होत्या. त्यासोबत १०३ झेलही घेतले होते.

जिम पार्क्स यांचा मुलगा बॉबीदेखील क्रिकेट खेळाडू आहे. तो हॅम्पशायर आणि केंटसाठी विकेट खेळलेला आहे. जिम पार्क्स यांच्या निधनावर ससेक्स क्रिकेट क्लबने शोक व्यक्त केला आहे.