कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करतोय. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाला अपयश आलं असलं तरीही गेल्या काही वर्षांमधला भारतीय संघाचा खेळ पाहता, टीम इंडिया सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. महेंद्रसिंह धोनीकडून भारतीय संघाची नेतृत्व विराट कोहलीकडे आली. विराटने आपल्या आक्रमक नेतृत्वशैलीने भारतीय संघाची एक वेगळी ओळख तयार केली आहे. अनेकदा विराटच्या मैदानातील आक्रमक स्वभाव आणि वर्तनावर टीकाही झाली. मात्र भारताचे माजी खेळाडू आणि सध्या क्रिकेट सल्लागार समितीचे महत्वाचे सदस्य मदनलाल यांनी विराटची पाठराखण केली आहे.
“विराटने आक्रमकपणा कमी करायला हवा असं लोकांना का वाटतं हेच मला समजत नाही. काही वर्षांपूर्वी सर्वांना भारताचं नेतृत्व करायला एक आक्रमक कर्णधार हवा होता, आणि आता तिच लोकं विराटला थांबवू पाहत आहेत. तो ज्या पद्धतीने मैदानात खेळतो ते पहायला मला आवडतं. सुरुवातीला भारतीय खेळाडूंबद्दल अशी धारणा होती की ते मैदानात आक्रमक नसतात. आता विराटच्या रुपाने भारताला एक चांगला खेळाडू मिळालाय तर लोकं त्यावरही प्रश्नचिन्ह उभं करतायत. आपल्याला विराटसारख्या आक्रमक कर्णधाराची गरज आहे.” मदनलाल टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
जय-पराजय हा खेळाचा एक भाग आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील पराभव आणि विराटची खालावलेली कामगिरी लक्षात घेतली तरीही सध्याच्या घडीला तो जगातला सर्वोत्तम फलंदाज असल्याचं मदनलाल यांनी नमूद केलं. अनेकदा काही तांत्रिक कारणांमुळे तुम्ही तुमचा फॉर्म गमावून बसता. पण मेहनत केली तर त्या गोष्टीही सुधारता येतात. अनेक दिग्गज खेळाडू यामधून गेलेले आहेत, मदनलाल यांनी विराटची बाजू घेतली. सध्या करोना विषाणूमुळे बीसीसीआयने सर्व सामने रद्द केले आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघ मैदानात कधी उतरतोय याकडे भारतीय चाहते डोळे लावून बसले आहेत.
