यूरो कप २०२० स्पर्धा आता मधल्या टप्प्यात आली आहे. बाद फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी संघाची धडपड सुरू आहे. आज क गटात युक्रेन विरुद्ध ऑस्ट्रिया हा सामना बुकारेस्टच्या नॅशनल एरेनावर रंगला. यात ऑस्ट्रियाच्या आक्रमणापुढे युक्रेनचा बचाव कमकुवत सिद्ध झाला. पहिल्या सत्रात बामगार्टनरने केलेल्या एकमेव गोलमुळे ऑस्ट्रियाने युक्रेनचा १-० असा पाडाव केला. या विजयामुळे ऑस्ट्रियाचे बाद फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. यूरो कपच्या इतिहासात ऑस्ट्रियाने पहिल्यांदाच बाद गाठली. बाद फेरीत इटली आणि ऑस्ट्रिया असा सामना होणार आहे. २७ जूनला हा सामना रंगणार आहे

दुसरे सत्र

पिछाडीवर पडलेल्या युक्रेनने ५४व्या मिनिटाला फाऊल केला. ऑस्ट्रियाला फ्री किक मिळाली पण त्यांना अजून एक गोल करता आला नाही. ६१व्या मिनिटाला युक्रेनने फ्री किक घेतली मात्र हा गोल स्वयंगोल झाला असता, गोलकीपरने चेंडू जाळ्यात जाण्यापासून अडवला. पहिल्या सत्रात युक्रेनचा बचाव कमकुवत वाटत होता, पण दुसऱ्या सत्रात त्यांनी ऑस्ट्रियाच्या खेळाडूंनी जास्त काळ आक्रमण करू दिले नाही. ७६व्या मिनिटाला ऑस्ट्रियाच्या लायनरने कॉर्नर घेतला, पण ड़्रागोविकला चेंडूशी संपर्क साधता आला नाही. राहिलेल्या वेळेत युक्रेनला ऑस्ट्रियाची बरोबरी साधता आली नाही.

 

पहिले सत्र

सामना सुरू झाल्यावर दोन्ही संघांना सुरुवातीलाच गोल करण्याची संधी मिळाली होती, पण त्यांनी ती सोडली. तिसऱ्या मिनिटाला ऑस्ट्रियाच्या श्लागरला गोल करण्याची संधी होती, मात्र त्याने खेळलेला फटका गोलपोस्टच्या वरून गेला. पुढच्याच मिनिटाला युक्रेनच्या यामलेंकोला गोल करण्याची संधी मिळाली, पण ऑस्ट्रियाच्या गोलकीपर बाचमॅनने तो होऊ दिला नाही. २०व्या मिनिटाला ऑस्ट्रियाच्या अलाबाने कॉर्नर घेतला, बामगार्टनरने या संधीचे सोने करत ऑस्ट्रियासाठी पहिला गोल केला. त्यानंतर ३७ आणि ३९व्या मिनिटाला ऑस्ट्रियासाठी दोन गोल करता आले असते, पण ते अपयशी ठरले. पहिला गोल केल्यापासून ऑस्ट्रियाने युक्रेनचा कमकुवत बचाव भेदत चेंडू गोलपोस्टकडे नेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सत्रातील अतिरिक्त वेळेत युक्रेनला कॉर्नर मिळाला, पण त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले.

 

युक्रेन विरुद्ध ऑस्ट्रिया या दोन्ही संघांसाठी आजचा सामना करो या मरोची लढाई होती. या सामन्यात एकाला बाद फेरीचे तिकीट मिळणार  होते. युक्रेन यापूर्वी नेदरलँड आणि नॉर्थ मसेडोनिया संघासोबत सामने खेळला आहे. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात युक्रेनला ३-२ ने पराभव सहन करावा लागला होता. तर युक्रेनने नॉर्थ मसेडोनिया संघाला २-१ ने पराभूत केले होते. तर दुसरीकडे ऑस्ट्रिया संघाने नॉर्थ मसेडोनिया संघाला ३-१ ने पराभूत केले होते. तर नेदरलँडकडून २-० असा पराभव सहन करावा लागला होता.

 

 

यापूर्वी युक्रेन आणि ऑस्ट्रिया दोनदा आमनेसामने आले होते. दोघांनी एक एक सामना जिंकला आहे. या दोन सामन्यात एकूण ८ गोलची नोंद आहे. तर मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदाच हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते, यात ऑस्ट्रियाचा संघ सरस ठरला.